सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बोर्डाच्या परीक्षेचा कुठल्याही प्रकारचा मानसिक ताण न घेता अत्यंत मोकळेपणाने विद्यार्थ्यांनी अभ्यास करावा. आणि अत्यंत संयमाने परीक्षेला सामोरे जावे. अनावश्यक ताण घेतल्यास त्याचा प्रतिकूलच परिणाम होतो. परीक्षेसाठी चांगला आहार घ्या तब्येत निरोगी ठेवा आणि मानसिक सक्षमतेसाठी मेडिटेशन प्राणायाम नियमित करा, असे आवाहन करिअर मार्गदर्शक रणजीत ताम्हणे यांनी केले.
आज दिनांक 17 डिसेंबर 2023 रोजी विद्याभूषण क्लासेस वाघळवाडी-सोमेश्वर नगर येथे इयत्ता बारावी या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी समुपदेशन शिबीर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरासाठी इयत्ता बारावी मध्ये असणारे विद्यार्थी व त्यांचे पालक उपस्थित होते. सदर शिबिरासाठी रणजीत ताम्हाणे यांनी समुपदेशन केले,
ते म्हणाले, आजच्या स्पर्धेच्या युगात मुलांनी परीक्षेला सामोरे जाताना नेमकं काय केले पाहिजे. परीक्षेचा तणाव न घेता अगदी सहजपणे अभ्यास केला तर शंभर टक्के यश मिळू शकते तसेच अभ्यास करताना आपल्या आरोग्याची आपण काळजी घेतली पाहिजे असेही त्यांनी यावेळी नमूद केले.
या शिबिराचे प्रास्ताविक व पाहुण्यांचे स्वागत विद्याभूषण क्लासेसच्या संचालिका प्रियांका काकडे यांनी केले . या कार्यक्रमाचे आभार भूषण काकडे यांनी मानले. सदर शिबिराला बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते या शिबिराचा फायदा आमच्या मुलांना होईल अशी भावना यावेळी पालकांनी व्यक्त केली.