सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : महेश जगताप
वाघळवाडी (ता. बारामती) गावामध्ये जाऊ तिथं खाऊ या चित्रपटाला शोभेल असे कथानक घडले आहे. या चित्रपटात विहिर चोरीला गेली आहे. तर वाघळवाडी गावात रस्ताही मंजूर झाला, त्याचे बिल ही काढले गेले मात्र त्याठिकाणी रस्ताच नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. तर दुसरीकडे एकाच रस्त्यावर तीन वेगवेगळ्या विभागाचा निधी टाकल्याची बाब निदर्शनास आली असून मंग दोन विभागाचा निधी कोणाचा घशात गेला? याबाबत चर्चेला उधाण आले आहे.
याबाबत ग्रामस्थ व आरंभ प्रतिष्ठानचे अध्यक्ष चेतनकुमार किसन सकुंडे यांनी शासनाच्या वेगवेगळ्या विभागातून माहिती अधिकारात माहिती मागवली होती. यामध्ये ही बाब उघड झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषदेचा बांधकाम विभाग तसेच ग्रामपंचायतचा चौदावा वित्त आयोग या विभागातून रस्त्यांसाठी लाखो रुपयांचा निधी मंजूर झाला होता. सन २०१८ ते २०२२ या कालावधीत हा निधी मंजूर करण्यात आला होता. दोन्ही विभागाकडून तसेच चौदाव्या वित्त निधीतून निधी मंजूर होऊन गावातील एकाच रस्त्यासाठी निधी टाकण्यात आलेला आहे व ते काम पूर्ण होऊन त्याचे बिल संबंधित ठेकेदाराला अदा केलेले आहे. एकाच रस्त्यासाठी लाखो रुपयांचा निधी येऊनही तो कुठे गेला असा सवाल ग्रामस्थांना उपस्थित केला आहे. या कामात ठेकेदाराने व संबंधित अधिकाऱ्याने चुकीचे काम केले असून याची चौकशी करण्याची मागणी सकुंडे यांनी पंचायत समितीकडे अर्जाद्वारे केली आहे. निरा बारामती रस्ता ते फडतरे घर रस्ता हा रस्ता झालेला नसतानाही ते काम पूर्ण होऊन त्याचे बिल संबंधित ठेकेदाराला अदा केलेले आहे. निरा बारामती मार्गावरील जाधव घर, सावंत घर या एकाच रस्त्यासाठी दोन्ही विभागांकडून निधी टाकण्यात आला आहे.
एकीकडे अनेक रस्त्यांची कामे रखडली असताना तत्कालीन ग्रामपंचायत पदाधिकारी व अधिकाऱ्यांच्या मेहरबानीमुळे एकाच रस्त्यासाठी तीन-तीन विभागातून निधी प्राप्त झाला आहे. ज्या ठिकाणी काम झाले त्या ठिकाणी रस्त्यांना नावे दिली नाहीत. पंचायत समितीकडे याबाबत ऑक्टोबर महिन्यात सकुंडे यांनी तक्रार दिली होती. मात्र दोन महिने होऊनही अद्याप पर्यंत यावर कोणतीही कार्यवाही झाली नाही.
-----------------
सार्वजनिक बांधकाम विभाग व जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला याबाबत चौकशी करण्याची सूचना देण्यात आली आहे. चौकशी अहवाल आल्यानंतर यावर योग्य ती कार्यवाही करू.
डॉ. अनिल बागल - गटविकास अधिकारी पंचायत समिती बारामती.