Baramati News ! काकडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी प्रदीप पाटील यांची रेणावीतील ग्रामीण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
बारामती : प्रतिनिधी
बारामती तालुक्यातील मु सा काकडे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा जेष्ठ कवी यांची सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील रेणावी येथील श्रीमती शहाबाई यादव सांस्कृतिक, साहित्य, कला विकास मंचच्यावतीने रेणावी येथे आयोजित २१ व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद ज्येष्ठ कवी प्रदीप पाटील भूषविणार आहेत. प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल प्रमुख पाहुणे तर शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील उद्घाटक आहेत. रविवारी दि. १० डिसेंबर रोजी हे संमेलन होत आहे, अशी माहिती मंचचे सचिव धर्मेंद्र पवार यांनी दिली.
        श्रीमती शहाबाई यादव यांनी निरक्षरतेवर मात करीत आपल्या प्रतिभेतून ग्रामीण जीवन आणि जगणं काव्यातून सादर केलं. त्यांच्या हृदयस्पर्शी कवीतांनी ग्रामीण मराठी साहित्य समृद्ध केलं. त्यांच्या प्रेरणेतून रेणावी येथे गेली २१ वर्षे मराठी साहित्य संमेलन आयोजित केले जाते.
        नव्वद नंतरच्या मराठी साहित्यातील संवेदनशील कवी म्हणून प्रदीप पाटील ओळखले जातात. 'आत्मसंवाद आणि 'अंतरीचा भेद' हे त्यांचे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. तसेच दोन कादंबऱ्या, काही कथा वाङ् मयीन नियतकालिकांतून प्रकाशित झालेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे ते सदस्य आहेत.
शिवाजी विद्यापीठाच्या मुख्य वित्त व लेखा अधिकारी डॉ. सुहासिनी पाटील संमेलनाच्या उद्घाटक तर विट्याचे प्रांताधिकारी डॉ. विक्रम बांदल प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तसेच सामाजिक कार्यकर्ते बंडोपंत राजोपाध्ये, श्रेयस उद्योग समुहाचे संस्थापक अॅड. बाबासाहेब मुळीक, कवयित्री स्वाती शिंदे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
         बालमंचाचे अध्यक्षपद आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील बाल साहित्यिक सुनील दबडे हे भूषविणार आहेत. यावेळी ज्येष्ठ लेखक अरविंद पुजारी मिरज, मनिषा पाटील देशिंग - हरोली आणि देवराष्ट्रे येथील मंदाकिनी सपकाळ यांना 'श्रीमती शहाबाई यादव साहित्य गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. गतवर्षीपासून सुरू केलेल्या कवीवर्य चंद्रकांत देशमुखे साहित्य सेवा पुरस्काराने कवी रमजान मुल्ला आणि डॉ. रामदास नाईकनवरे यांना गौरविण्यात येणार आहे. दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभेच्या सहयोगातून होत असलेल्या या साहित्य संमेलनास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहनही धर्मेंद्र पवार यांनी केले आहे.
To Top