सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
बहुतांशी वेळा घरफोडी होऊन पैसे ,दागदागिन्यांची चोरी होते.मात्र भाटघर जलाशया शेजारील संगमनेर ता.भोर येथे चक्क चोरट्यांनी दत्त मंदिरातील पितळाची दत्त मूर्ती चोरून नेल्याने परिसरात चांगलीच खळबळ उडाली आहे.
संगमनेर येथील रामचंद्र साहेबराव बांदल यांच्या खासगी मालकीच्या मंदिरतून शनिवार दि.२ रात्री उशिरा मूर्तीं चोरी गेल्याची घटना घडली.राजगड नसरापूर पोलिसांना घटनेची माहिती दिली असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले.तालुक्यातील संगमनेर - नऱ्हे रस्त्यालगत संगमनेर हद्दीत रामचंद्र बांदल यांनी श्रद्धेपोटी आपल्या जागेत श्री दत्त मंदिर उभारले असून गावातील सर्व नागरिकांची मंदिरात ये-जा असते.चोरट्यांनी पितळेची, गाय ,श्वान या सारख्या मूर्तीं तसेच इतर वस्तूंना हात लावला नाही.मात्र या घटनेच्या निमित्याने पुन्हा तालुक्यात अनेक वर्षांनी देव देवतांच्या मूर्तीं चोरणारी टोळी तालुक्यात सक्रिय झाल्याचे समोर येत आहे. यामुळे मूर्तीं चोरांनी पोलिसांसमोर आव्हान उभे केले असून पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांचे मार्गदर्शनाखाली राजगड पोलीस पुढील तपास करीत आहेत.