Bhor News ! संतोष म्हस्के ! नेरे आरोग्य केंद्र असून अडचण..नसून खोळंबा ! १० कर्मचाऱ्यांवर ४५ गावांचा भार

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुकाच्या दक्षिणेकडील प्राथमिक आरोग्य केंद्र नेरे ता.भोर सर्व सोयीनंयुक्त सुसज्ज असले आरोग्य केंद्राधील एका अधिकाऱ्यासह ९ कर्मचाऱ्यांवर ५ उपकेंद्रातील ४५ गावांचा भार असल्याने कर्मचाऱ्यांना नागरिकांना आरोग्य सेवा देताना कसरत करावी लागत आहे.परिणामी उपकेंद्रातील ग्रामस्थांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
      नेरे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून उत्रोली,शिंद,पसुरे, वेळवंड ,नेरे उपकेंद्रांमधील ४५ गावांना आरोग्य सेवा पुरवण्यासाठी २ अधिकारी व १९ कर्मचाऱ्यांची नेमणूक असतानाही मागील दोन ते तीन वर्षांपासून १ अधिकारी व ९ कर्मचारी यांच्यावर आरोग्य सेवेचा भार आहे.परिणामी भोर तालुका दुर्गम डोंगरी असल्याने आरोग्य केंद्राच्या ६ उपकेंद्रांमधील नागरिकांच्या आरोग्य सेवेची गैरसोय होत आहे. प्रशासनाच्या उदासीनतेमुळे रिक्त पदे भरली जात नसल्याने अनेक वेळा उपकेंद्रांच्या बहुतांशी गावांमधील आरोग्य सेवा ठप्प होत आहे.सध्या आरोग्य केंद्रामध्ये वैद्यकीय अधिकारी १,आरोग्य सहाय्यक पद १, आरोग्य सेविका ३, आरोग्य सेवक २, आरोग्य औषध निर्माण अधिकारी १, शिपाई १, कनिष्ठ लिपिक १ असे एकूण १० कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत.शासन नागरिकांना उत्कृष्ट आरोग्यसेवा मिळावी यासाठी नवीन नवीन पावले उचलत असले तरी भोर तालुक्यातील बहुतांशी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कर्मचारी व अधिकारी यांची अनेक पदेरिक्त असल्याने तालुक्यात आरोग्य सेवेचा बोलवारा वाजत आहे.
      भोर तालुक्यातील डोंगरदऱ्यातील गोरगरीब रुग्ण नेरे, आंबवडे ,जोगवडी आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेवेवर अवलंबून आहेत.मात्र दुर्गम भागात आरोग्य केंद्र असतानाही आरोग्य कर्मचारी तसेच अधिकारी यांच्या अभावी आरोग्य सेवा मिळत नसल्याने रुग्णांना खाजगी रुग्णालयामध्ये आर्थिक नुकसान करून उपचार घ्यावे लागत आहेत.शासनाने भोर तालुक्यातील दुर्गम डोंगरी भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्तपदे लवकरात लवकर भरावीत अशी मागणी होत आहे.
To Top