पुणे : प्रतिनिधी
अजंठा सातमाळ डोंगर रांगेतील कोळधेर, राजधेर, इंद्राई, चांदवड आणि मेसणा हे पाच गिरीदुर्ग ३९ किलोमीटरची पदभ्रमंती करून टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी दोन दिवसात सर करीत श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकरांना मानाचा मुजरा केला.
या मोहिमेची सुरुवात श्रीमंत महाराजा यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ असलेला वाफगाव, ता.खेड, जि.पुणे येथील होळकर वाड्यास नतमस्तक होऊन झाली. पहिल्या दिवशी राजधेर वाडी, ता. चांदवड, जि. नाशिक येथुन या भटकंतीचा श्री गणेशा झाला. पहिल्यांदा कोळधेर किल्ला सर करण्यात आला. त्यानंतर तिथे शेजारीच असणारा राजधेर किल्ला सर करण्यात आला. येथुन गडउतार होऊन सुमारे ४ किलोमीटर गाडीने प्रवास करून इंद्राई किल्ल्याच्या पायथ्याला जाऊन तो सर करण्यात आला. या पहिल्या दिवसाच्या १२ तासांच्या भटकंतीमध्ये सुमारे २७ किलोमीटरची पदभ्रमंती झाली. रात्रीचा मुक्काम चांदवड किल्ल्याच्या पायथ्या नजिकच करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी पहाटेच रेणुका माता मंदिर येथे दर्शन घेऊन चांदवड किल्ल्याकडे गिर्यारोहक मार्गस्थ झाले. येथील एक शेवटचा ३५ फुटी कातळ टप्पा प्रस्तरारोहण करून सर करण्यात आला. सर्वात शेवटी मेसणा किल्ला सर करून गड उतार होऊन या मोहिमेची सांगता झाली. दुसऱ्या दिवशीच्या ९ तासांच्या भटकंतीमध्ये सुमारे १२ किलोमीटरची पदभ्रमंती करण्यात आली.
या भटकंतीमध्ये टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सचे जॅकी साळुंके, लव थोरे, सुर्यकांत अदाते, सिद्धार्थ देसाई, गणेश शेणॉय, सारंग गोंधळेकर, माधवी पवार, गणेश भंडारी, विजय इंदुरकर, भुषण तावडे, रामचंद्र कर्णे, श्रीपाद देशपांडे, विवेक गायकवाड, राजेंद्र साळुंके, रवी गाडे, नयना बोराडे आणि डॉ.समीर भिसे हे गिर्यारोहक सहभागी झाले होते.