सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा - ओंकार साखरे
तीर्थक्षेत्र कुसूंबी ता. जावली येथील श्री काळेश्वरी देवीचे मंदिर एक महिन्यासाठी श्री काळेश्वरी देवीच्या मूर्तीला वज्रलेप विधी करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहीती काळेश्वरी देवी ट्रस्टचे अध्यक्ष रामदार वेंदे यांनी दिली.
लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या व सातारा जिल्ह्यातील प्रमुख तीर्थक्षेत्र असलेल्या कुसूंबी ता. जावली गावातील श्री काळेश्वरी मातेचे मंदिर भाविकांसाठी (ता.२८) डिसेंबर पासून एक महिन्याकरिता बंद राहणार आहे. याकाळात श्री काळेश्वरी मातेच्या वज्रलेपाचा विधी पार पडणार आहे. दरम्यानच्या काळात भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता (ता.२९)डिसेंबर रोजी मंदिरात होमहवन होणार असून यावेळी मातेचे देवत्व कलशात स्थापन करण्यात येणार आहे. या कलशाचे दर्शन भाविकांसाठी खुले राहणार आहे. मात्र मंदिराच्या मुख्य गाभाऱ्यात भाविकांना प्रवेश मिळणार नाही. वज्रलेपाचा विधी (ता.१७) जानेवारी पर्यंत सुरू राहणार आहे. यानंतर (ता.१८)जानेवारी पासून श्री काळेश्वरी मातेच्या मूर्तीच्या पुनरस्थापणेचा विधी पुढील पाच दिवसाकरिता चालणार आहे. वज्रलेपाच्या काळात काळेश्वरी मंदिरात दररोज सकाळी आठ ते रात्री आठ या काळात मंत्रजप सुरू राहणार आहे. अशी माहिती काळेश्वरी देवी देवस्थान ट्रस्टच्या पदाधिकाऱ्यांनी दिली आहे.