सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊसतोडणी मजूर व मुकादम यांच्याकडून फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी एकत्रितरित्या तक्रारी पोलिसांकडे दाखल कराव्यात. पुरावे तपासून रितसर गुन्हे दाखल करण्याची आणि संबंधित फसवणूक करणारांना समन्स पाठविण्याची जबाबदारी पोलिस घेतील. वाहतूकदारांनी एकेकटे वसुलीसाठी जाऊन धोका पत्करू नये, असे आवाहन अप्पर पोलिस अधिक्षक आनंद भोईटे यांनी केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यावर ऊसतोडणी वाहतूकदार, साखर कारखान्याचे प्रतिनिधी यांच्यासोबत संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. फसवणूक झालेल्या वाहतूकदारांनी आपापल्या तक्रारी भोईटे यांच्यासमोर गाऱ्हाणे मांडले. कुणी मुकादमांनी फसवणूक केल्याचे सांगितले तर कुणी थेट ऊसतोड मजुरांनीच गंडा घातल्याची माहिती दिली. कोट्यवधी रूपयांना चुना लागल्याने जगणे अवघड झाल्याच्या तसेच कर्जबाजारी झाल्याच्याही तीव्र प्रतिक्रिया काही वाहतूकदारांनी दिल्या. यामुळे हे प्रकरण भोईटे यांनी गांभीर्याने घेतले आणि कायदेशीर मार्गाने याचा अॅक्शन प्लॅन कसा असू शकेल याबाबत वाहतूकदारांशी समाधानकारक चर्चा केली. जळगाव जिल्ह्याच्या पोलिस अधिकाऱ्यांशीही मोबाईलव्दारे त्यांनीं सवाद साधला. याप्रसंगी वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन काळे, फौजदार पांडुरंग कान्हेरे उपस्थित होते. कारखान्याच्या वतीने अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप, कार्यकारी संचलाक राजेंद्र यादव, संचालक लक्ष्मण गोफणे, प्रवीण कांबळे, शेतकी अधिकारी बापूराव गायकवाड, सतीश काकडे, विधी सल्लागार अॅड. अभिजित जगताप, वाहतूक संघटनेचे कार्यकर्ते आदी उपस्थित होते.
भोईटे म्हणाले, पुरावे सादर केल्यास फसवणूक करणाऱ्या मजूर व मुकादमांवर फसवणुकीचे आणि धनादेश न वटल्याचे गुन्हे दाखल करणे शक्य आहे. सोमेश्वर कारखाना कार्यक्षेत्रातील जेजुरी, वडगाव निंबाळकर या पोलिस ठाण्यात तक्रारी एकत्रित दाखल कराव्यात. काही प्रकरणांमध्ये संबंधित व्यक्तीला बोलावून घेऊन तडजोडही करण्याचा प्रयत्न पोलिसांमार्फत केला जाईल. तसेच एकेकटे वसुलीसाठी गेल्यानंतर वसुली होत नाही शिवाय धोका उद्भवू शकतो. स्वतः पोलिस समन्स बजावतील. यासाठी पोलिसांच्या पातळीवर विशेष समितीही स्थापन केली जाईल.
---