सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : adv. गणेश आळंदीकर
बारामती तालुक्यातील सोमेश्वर व माळेगाव कारखान्यांचा गळीत हंगाम निम्म्यावर आला आहे. नीरा बारामती रस्ता तसेच वाणेवाडीच्या रस्तावरील वाणेवाडी येथील पूल, करंजे पुलचा निरा बारामती रस्त्यावरील महत्त्वाचा पुल, शेंडकरवाडी येथील पूल, पणदरे येथील पूल कोट्यावधी खर्चाची ही कामे गेली अनेक महिने संथ गतीने चालू आहेत.
या पुलांवरून वाहतूक करताना उसाची वाहनांची कसरत सुरू आहे. ट्रॅक्टरची पुढची चाके उचलून अक्षरशः सर्कस चालल्याप्रमाणे ऊस वाहतूकदार जीव मुठीत घेऊन उसाची वाहतूक करीत आहेत. आज असाच एक ट्रॅक्टर सुमारे दहा मिनिट करंजेपुल येथे पुलाचा चढ चढण्याचा प्रयत्न करीत होता. दोन्ही बाजूनी ट्रॅफिक जाम झाले होते. मोटरसायकल चालक जीव मुठीत घेऊन रस्ता काढत होते. बारामती शहरातून दर शनिवारी रविवारी दौरा असल्याने कामाचा आढावा घेतला जातो. मात्र ग्रामीण भागात मुख्यतः रस्त्यांवरील पुलाचे काम अतिशय संथ गतीने चालले आहे. त्याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. करंजेपुलच्या पुलावर तर धुळीचे साम्राज्य कायम असते. स्थानिक लोकांना कंत्राटदार कोण माहित नसल्याने कामगारांना बोलण्यात अर्थ नाही असं म्हणून लोक चार शिव्या हासडून पुढचा मार्ग धरतात. बैलगाड्यांची अवस्था देखील अशीच आहे. खूप कसरत करत बैलगाड्या ऊस वाहतूक करीत आहेत.
याबाबत संबंधित विभागाने याकडे तातडीने लक्ष घालत पुलांची कामे पूर्ण करावीत अशी मागणी वाहनचालक करत आहेत.