Baramati News ! ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांना रामराजे स्मृती गौरव पुरस्कार जाहीर

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
बारामती तालुक्याचे पाहिले सभापती व सोमेश्वर कारखान्याचे  संस्थापक संचालक रामराजे जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा रामराजे स्मृती गौरव पुरस्कार जेष्ठ ग्रामीण साहित्यिक प्रा. व. बा. बोधे यांना जाहीर झाला आहे.
            प्रा. बोधे यांनी आतापर्यंत शंभर पेक्षा अधिक पुस्तकांचे लेखन केले आहे. यामध्ये कथा, कादंबरी, ललित, चरित्र, आत्मचरित्र अशा वैविध्यपूर्ण साहित्याचा समावेश आहे. महाराष्ट्रातील ते मोठे ग्रामीण साहित्यिक आहेत. त्यांच्या कोकरउड्या, रानपालखी, फुलचुखी, कंदिलाचे दिवस, फिस्ट, वैखरीचा वारकरी, चंदन बटवा, अशा पुस्तकांना विविध पुरस्कार मिळालेले आहेत. त्यांच्या ग्रामीण शैलीने महाराष्ट्रातील साहित्य रसिकाला वेड लावलेले आहे. याशिवाय प्रा. बोधे यांनी व्याख्यानाच्या माध्यमातून प्रबोधन करत संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढला आहे. प्राध्यापक बोधे हे राज्यातील एक आदर्श शिक्षक म्हणून नावाजले जातात. त्यांचे असंख्य विद्यार्थी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात साहित्य सेवा व शिक्षण सेवा करत आहेत. प्राध्यापक बोधे हे मागील ३६ वर्षापासून निरा येथे झंकार व्याख्यानमाला चालवतात राज्यभरातील विचारवंत, साहित्यिक ,  कलाकार या निमित्ताने ग्रामीण भागाला परिचित झाले. त्यांच्या प्रेरणेतून बारामती व पुरंदर तालुक्यात अनेक व्याख्यानमाला उभ्या राहिल्या प्राध्यापक बोधे यांनी मु.सा. काकडे महाविद्यालयात ३३ वर्ष अथकपणे अत्यंत निष्ठेने व प्रामाणिकपणे शिक्षण सेवा केली. त्यांना  राज्य शासनाचे, विविध साहित्य संस्थेचे अनेक नामांकित पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. शिक्षण क्षेत्रातील आदर्श शिक्षक पुरस्कारही त्यांना मिळालेले आहेत. मराठवाडा विद्यापीठात त्यांची पुस्तके अभ्यासाला आहेत तर बालभारतीने ही त्यांच्या खेळ या गोष्टीचा समावेश केला होता. वैयक्तिक पातळीवरही त्यांनी आपल्या विद्यार्थ्यांना निरा व रहिमतपूर परिसरातील लोकांना प्रसिद्धीस न येता मदत केली आहे.
             दि. २४ रोजी सकाळी साडेनऊ वाजता हा पुरस्कार सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांच्या हस्ते रामराजे जगताप स्मृती मंगल कार्यालय वाणेवाडी ता. बारामती येथे प्रदान करण्यात येणार आहे. 
To Top