सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ऊस कुणाकुणाला तोडायला येतो? लहान भावंडाला कोण कोण सांभाळते? कलेक्टर, शिक्षक, वकील, पोलिस व्हायला कुणाला आवडेल? असे प्रश्न सोमेश्वर कारखान्याचे माजी अध्यक्ष राजवर्धन शिंदे यांनी ऊसतोड मजुरांच्या मुलांना विचारत त्यांना बोलते केले. हातातील कोयता बाजूला करायचा असेल तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही असे आवाहनही त्यांनी मुलांना व पालकांना केले.
येथील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या वतीने कार्यस्थळावरील ऊसतोड मजुरांच्या अडीचशे मुलांसाठी 'कोपीवरची शाळा' हा अभ्यासवर्ग चालविला जातो. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने व मुलगा ओंकार फौजदारपदी निवडला गेल्याने निवृत्त शिक्षक दत्तात्रेय हेगडे यांनी स्वखर्चाने पहिली ते पाचवीच्या सव्वाशे मुलांना गणवेश वाटप केले. याप्रसंगी आयोजित केलेल्या कार्य़क्रमात श्री. शिंदे बोलत होते. अध्यक्षस्थानी शिक्षण घेऊन सेनादलात गेलेले बाबासाहेब गर्जे होते. दरम्यान आझाद शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या १९९८-९९ च्या तुकडीतील पोपटराव पगार, राजेंद्र चौधरी, संजय लोहार, प्रा. राहुल गोलांदे, शिल्पकला रंधवे या माजी विद्यार्थ्यांनी कोपीवरच्या शाळेतील मुलांना वह्या व शालेय साहित्य उपलब्ध केले होते. त्याचेही वाटप करण्यात आले. तसेच वाघळवाडीचे सरपंच हेमंत गायकवाड, वाणेवाडीचा साद संवाद ग्रुप यांच्यामार्फत ऊसतोड मजुरांना संकलीत केलेल्या जुन्या कपड्यांचे वाटप करण्यात आले.
याप्रसंगी शिंदे म्हणाले, मुलांनीही मोकळेपणाने माहिती दिली. शिंदे म्हणाले, कारखान्याने पुढाकार घेऊन चालविलेली कोपीवरची शाळा हा राज्यातील पहिला प्रकल्प आहे. गेली आठ वर्ष मुलांच्या शिक्षणासाठी कारखाना कटीबध्द आहे. नवनाथ मेमाणे, संभाजी खोमणे, आरती गवळी, अश्विनी लोखंडे, संतोष होनमाने, संतोष ठोकळे, विकास देवडे, अक्षय इथापे, अनिता ओव्हाळ यांनी संयोजन केले.
नौशाद बागवान यांनी सूत्रसंचालन केले तर समन्वयक संतोष शेंडकर यांनी आभार मानले.