सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
येथील मु .सा. काकडे महाविद्यालयात मुगुट महोत्सव २०२४ चे आयोजन करण्यात आले होते. या महोत्सवाचे उद्घाटन महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे यांच्या शुभहस्ते झाले.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रसिद्ध गझलकार आबेद शेख व डॉ. दिनेश मोरे हे होते. याप्रसंगी प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सदस्य, मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा.अच्युत शिंदे, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
यावेळी गझलकार आबेद शेख यांनी 'सुगंधी बाग आहे ती' या गझल कार्यक्रमातून अनेक गझल सादर केल्या, तर डॉ. दिनेश मोरे यांनी 'थोडासा मिळाला दिलासा मला, पण आणखी हवा खुलासा मला' यासारख्या अनेक गझल सादर केल्या.
मुगुट महोत्सवाच्या बक्षीस वितरण समारंभासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डॉ. पराग काळकर होते तर अध्यक्षस्थानी महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे होते. याप्रसंगी प्रसिद्ध उद्योजक व माझे विद्यार्थी आर एन शिंदे, प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे, सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व सदस्य, मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा.अच्युत शिंदे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. पराग काळकर यांनी 'महाविद्यालयाच्या स्मरणातील दिवस म्हणजे स्नेहसंमेलन, आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाने तो द्विगुणित होतो. महाविद्यालयाने जी संधी उपलब्ध करून दिली आहे त्या संधीच्या माध्यमातून आपल्या कलागुणांचा अविष्कार करण्याची संधी याच्यातून उपलब्ध होते आणि या कलागुणातून व्यक्तिमत्व साकार होते. तसेच जीवनाला सुंदर बनवण्यासाठी शिक्षण आवश्यक आहे कला, क्रीडा नेतृत्व तसेच अनेक गोष्टी आवश्यक आहे आणि अशा स्नेहसंमेलनाचे नियोजन प्रयोजन हे नेतृत्वगुणांना वाव देणारे आहे याची प्रचिती तुम्हाला येईल. या महोत्सवातून विद्यार्थ्यांनी स्वतःला ओळखायला शिकले पाहिजे स्वतःमध्ये कोणते गुण आहेत हे ओळखून पुढील जीवनाची वाटचाल केली पाहिजे जीवनामध्ये कार्य करताना सुरुवातीला यश मिळेलच असे नाही परंतु सातत्याने प्रयत्न केले तर निश्चित यश मिळते. स्वतःच्या चुकांमधून जो शकतो तोच जीवनात यशस्वी होतो' असे विचार त्यांनी मांडले. आयुष्याला जर दिशा मिळाली नाही तर आयुष्याची दशा होती आणि ही दिशा या महोत्सवामुळे तुम्हाला मिळाली आहे. जीवनात जर तुम्हाला यश मिळवायचे असेल तर तुम्हीै त्रिसुत्राचा अवलंब केला पाहिजे ते सूत्र म्हणजे माझ्या व्यक्तिमत्त्वाला साजेसे काय आहे ते शोध घेऊन ते ध्येय निश्चित करा आणि एकदा ध्येय निश्चित केले की ते कार्य पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करा तरच यश मिळेल शेवटी महाविद्यालयाने वर्षभरात केलेल्या अफलातून कामगिरीबद्दल अभिनंदन केले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी प्रास्ताविकामध्ये महाविद्यालयाने वर्षभरात केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला व मुगुट महोत्सवाचे समन्वय प्रा. अच्युत शिंदे यांनी पाहुण्यांचा परिचय देऊन महोत्सवाची रूपरेषा स्पष्ट केली. प्र.कुलगुरू यांच्या शुभहस्ते मुगुट अंकाचे अनावरण झाले. आणि शेवटी बक्षीस पात्र शिक्षक व विद्यार्थी यांचा सन्मान करण्यात आला. या महोत्सवा मध्ये विद्यार्थ्यांसाठी साडी डे, टाय डे, मिस मॅच डे, ट्रॅडिशनल डे, स्पोर्ट्स डे, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, शेलापागोटे, विविध गुणदर्शन इत्यादींचे आयोजन केले होते. यामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन या डे चा आनंद घेतला, तसेच या महोत्सवामध्ये विद्यार्थ्यांसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये वक्तृत्व स्पर्धा, नाविन्यपूर्ण म्हणी तयार करणे, प्रश्नमंजुषा, एक मिनिट मराठी बोला स्पर्धा, काव्यवाचन स्पर्धा, निबंध स्पर्धा, तसेच आनंद मेळा, शेला पागोटे आणि फूड अँड फन फेस्टिवल चे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी सहभाग घेऊन याचा आनंद घेतला.
विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळावा म्हणून फॅन्सी ड्रेस चे आयोजन केले होते यामध्ये राम जन्म सोहळा ते छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक तसेच जेजुरीचा खंडोबा, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या वेशभूषा विद्यार्थ्यांना सादर करून सर्वांची वाह!वाह मिळवली. या कार्यक्रमाचे आयोजन समन्वयक डॉ. निलेश आढाव यांनी केले होते.
मुगुट महोत्सवाचा शेवट हा विविध गुणदर्शनाने झाला. यामध्ये गणेश वंदनेने या कार्यक्रमाची सुरुवात झाली यामध्ये चंद्रा, अप्सरा या लावण्यांना प्रतिसाद मिळाला तसेच हिंदी मराठी नव्या जुन्या गाण्यांचा कार्यक्रमाने रंगत आली . यामध्ये विद्यार्थ्यांनी सादर केलेला लग्न सोहळा देखील आगळावेगळा ठरला. तसेच राम जन्मभूमी सोहळा, कृष्णलीला, कोळी नृत्य व शेवटी छत्रपती शिवाजी महाराज राज्याभिषेक सोहळ्याने या कार्यक्रमामध्ये रंगत आली. याचे नियोजन मुगुट महोत्सवाचे समन्वयक प्रा. अच्युत शिंदे यांनी केले होते.
संपूर्ण मुगुट महोत्सवाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. कल्याणी जगताप यांनी केले. या संपूर्ण मुगुट महोत्सवामध्ये महाविद्यालयाच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सतीश काकडे , महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष अभिजीत काकडे, महाविद्यालयाचे सचिव सतीश लकडे, व्यवस्थापन समितीचे सर्व मान्यवर सदस्य या सर्वांचेच विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली मुगुट महोत्सवाच्या विविध समितींचे समन्वयक सदस्य प्राध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी या सर्वांचेच सहकार्य लाभल्याने हा सात दिवसाचा मुगुट महोत्सव २०२४ हा महोत्सव यशस्वीरित्या संपन्न झाला.
COMMENTS