Baramati News ! गांधी-नेहरूंची योग्यता आज कुणाकडेही नाही ! सज्जन माणसांची स्पर्धा भरवली तर त्यात पुरुषोत्तम जगतापांचा पहिला नंबर येईल!! प्रा. व. बा. बोधे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
 महात्मा गांधी, पंडित नेहरू अशी माणसं आता जगाच्या पाठीवर कुठेही नाहीत. त्यांची योग्यता कोणालाही येणार नाही. सामान्य माणसाची, कलावंतांची, साहित्यिकांची, विचारवंतांची त्यांना कदर होती. असे मत जेष्ठ साहित्यिक प्रा. व.बा. बोधे यांनी व्यक्त केले. 
             वाणेवाडी ता. बारामती येथे बारामती तालुक्याचे पाहिले सभापती रामराजे जगताप यांच्या स्मृतिदिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोधे बोलत होते. ते पुढे म्हणाले, गांधी-नेहरूंचे समाजावर प्रेम होतं. लेखकांवर प्रेम होतं. ज्या चर्चिलनं नेहरूंना अनेकदा तुरुंगात टाकलं तो चर्चिल आजारी असताना पंतप्रधान झालेले पंडित नेहरू त्यांना भेटायला गेले.  बर्नाड शॉ नावाचा लेखक आवडायचा त्या लेखकाला भेटायला ते गेले होते. ७८५ दिवस तुरुंगात राहिलेला हा माणूस संवेदनशील होता. त्यांनी देश उभा केला. महात्मा गांधी हा अत्यंत निर्भय माणूस. त्यानंतर असा निर्भय माणूस झाला नाही.      

               चंपारण्यमध्ये निळीच्या व्यापाऱ्यांविरोधात ४०० लोकांना घेऊन त्यांनी संप केला. तेव्हा कंपनीचा मालक म्हणाला, ४०० लोक घेऊन फिरतो, एकटा येऊ दे त्याला गोळ्या घालू. रात्री दीडला हे कळाल्यावर गांधीजी घराबाहेर पडले आणि थेट व्यापाऱ्याकडे गेले. त्यांना पाहताच व्यापाऱ्याचे हात आपोआप जोडले गेले. गांधीजी म्हणाले, मला गोळी घाला. यावर त्या व्यापाऱ्याने त्यांचे पाय धरले. गांधीजींना पाहून सत्ताधीश इंग्रज पटापट उभे राहत. आता अशी माणसं राहिली नाहीत, अशी खंत बोधे यांनी व्यक्त केली.
          सहकारात वसंत काका जगताप पुरुषोत्तम जगताप अशी चांगली माणसे पुढे आली रामराजे जगताप यांचा सामाजिक वारसा पुरुषोत्तम जगताप समर्थपणे पुढे  चालवत आहेत. सज्जन माणसांची स्पर्धा भरवली तर त्यामध्ये पुरुषोत्तम जगताप यांचा पहिला क्रमांक येईल असे ते चारित्र्यसंपन्न व्यक्तिमत्व आहे, असे कौतुक बोधे यांनी केले.
        लेखकाला किती पैसे मिळतात कवितेला किती पैसे मिळतात यामध्ये काही अर्थ नसतो. त्यातून समाजाची किती जागृती होते हे लेखकासाठी महत्त्वाचे असते. पैसा संपत्ती यामध्ये लेखक अडकून राहत नाही. शेतातल्या बांधाच्या झाडाखाली बसून लिहू शकतो. लेखकाला सर्व दाही दिशा मोकळ्या असतात. पैसेवाचून त्याचे अडत नाही. खेड्यातली मुलं कधीही उपाशी राहत नाही. कोणाचाही डहाळा उपटायची, फळ खायची त्यांना परवानगी असते. शहरात मात्र ही आढळत नाही. असे प्रा. बोधे यांनी सांगितले.
To Top