सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
जिल्ह्यात सध्या सुरू असलेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या संपामधील भोर तालुक्यातील ७ अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि मिनी अंगणवाडी सेविका यांना सेवेतून कायमस्वरूपी बडतर्फ करण्यात आले. जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास विभागाने ही धडक कारवाई केली.
गेल्या ३६ दिवसांपासून अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा बेमुदत बंद सुरू आहे. या कालावधीमध्ये भोर तालुक्यासह जिल्ह्यातील बहुतांशी सर्व अंगणवाड्या बंद आहेत.अंगणवाडीमधील बालकांना पोषण आहार न मिळणे, त्याचबरोबर अंगणवाड्या बंद ठेवल्याप्रकरणी अधिनियम २००५ मधील तरतुदीनुसार नियुक्ती प्राधिकारी तथा तालुका महिला व बालविकास अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.भोर तालुक्यातील कारवाई करण्यात आलेल्या गोकवडी,बाजारवाडी, उदनखानवाडी,आपटी,उत्रोली -२,निगुडघर, उत्रोली-४ अशा ७ मिनी अंगणवाडी मधील कर्मचारी गेल्या दोन-तीन महिन्यांपासूनच अंगणवाड्यांवर नियुक्त झालेल्या होत्या.नवनियुक्त कर्मचारी असतानादेखील संपात उतरल्यामुळे त्यांना अंगणवाड्या सुरू करण्यासंदर्भातील सूचना देण्यात आली होती; परंतु त्या संपामध्ये ठाम राहिल्याने त्यांच्यावर कायमस्वरूपी बडतर्फीची कारवाई करण्यात आल्याचे जिल्हा परिषदेचे महिला व बालविकास अधिकारी जामसिंग गिरासे यांनी सांगितले.तर बडतर्फ केलेल्यामध्ये मुळशी दोन व वेल्हे तालुक्यातील दोन कर्मचाऱ्यांचा यामध्ये समावेश आहे.