सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : प्रतिनिधी
मोबाईलच्या वाढत्या युगामध्ये विद्यार्थ्यांकडुन वाचन संस्कृती लोप पावत चालली असल्याची खंत संसद रत्न खासदार सुप्रिया सुळे यांनी केली.
सुपे येथील विद्या प्रतिष्ठान संचलित न्यु इंग्लिश स्कुल मधील सुमारे १६० विद्यार्थीनींना मोफत सायकल वाटप सुळे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. या कार्यक्रमास संस्थेच्या सचिव नीलिमा गुजर, सदस्य किरण गुजर, रजिस्ट्रार श्रीश कंभोज, सरपंच तुषार हिरवे उपस्थित होते.
सुळे म्हणाल्या की, मोबाईलच्या वाढत्या युगामध्ये विद्यार्थ्यांनी पुस्तकांशी मैत्री करुन वाचन संस्कृती जोपासली पाहिजे. तसेच शाळांनी ग्रंथालयांमध्ये वेगवेगळी पुस्तके ठेवुन विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण करणे आवश्यक असल्याचे मत सुळे यांनी व्यक्त केले. तसेच सुळे यांनी पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधत शिक्षण व वाचनाचे महत्व पटवुन दिले.
यावेळी येथील स्कुलमधील शिक्षकांनी कोविड - १९ लॉकडाऊनमध्ये बनविलेल्या ६ हजार शैक्षणिक साधनांची पाहणी सुळे यांनी केली. या साधनांची माहिती जाणून घेत शिक्षकांच्या कामाचे कौतुक केले. तसेच विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साधनांच्या वापराचे केलेले सादरीकरण पाहून बनविलेली सर्व शैक्षणिक साधने अतिशय सुंदर असल्याचे मत सुळे यांनी यावेळी व्यक्त केले.
माही भोंडवे, रुप्र खेत्रे, वैष्णवी चांदगुडे, पायल ढमे आदी विद्यार्थ्यांनी सुळे यांना विविध प्रश्न विचारले. यावेळी पायल ढमे यांनी शेतकऱ्यांना व विद्यार्थ्यांना नेहमीच सतावत असलेल्या वीज प्रश्न सोडविण्याविषयी सुळे यांना माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक योगेश पाटील यांनी केले. सूत्रसंचालन विद्या घोडके यांनी केले. तर दादा राऊत यांनी आभार मानले.
...........................................