सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
कोरेगाव : प्रतिनिधी
सातारा जिल्ह्यातील शिवसेना कोरेगाव शहर शाखेच्या वतीने हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या हिंदुहृदयसम्राट केसरी बैलगाडी शर्यतीमध्ये मुरूम (ता. बारामती) येथील स्वप्नील दीपक साखरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक पटकावला.
येथील रहिमतपूर रोडवरील औद्योगिक वसाहतीच्या समोरील पटांगणावर झालेल्या या शर्यती 'एक आदत एक बैल' अशा पद्धतीने भरवण्यात आलेल्या होत्या. या शर्यतीत साताऱ्यासह पुणे, सोलापूर, सांगली जिल्ह्यांतील सुमारे साडेतीनशे बैलगाड्या सहभागी झाल्या होत्या. शर्यती अत्यंत चुरशीने झाल्या. शर्यती पाहण्यासाठी शौकिनांची मोठी गर्दी झाली होती. शर्यतीच्या अंतिम फेरीत मुरूम येथील श्री. साखरे यांच्या बैलगाडीने प्रथम क्रमांक मिळवला, तर अनया योगेश बगें- हॉटेल महिंद्रा एक्झिकेटिव्ह सातारा या बैलगाडीने द्वितीय, शिवांश जगदाळे (कुमठे) आणि ज्योतिर्लिंग ट्रेडर्स- पांडा ड्रायव्हर अमोल बगें या दोन्ही बैलगाड्यांना तृतीय क्रमांक विभागून देण्यात आला. महंमद मुजावर (विंग कऱ्हाड) यांच्या बैलगाडीने पाचवा, वाढसिद्धनाथ प्रसन्न- हिंद केसरी बावऱ्या ग्रुप (दुधनवाडी करवडी) या बैलगाडीने सहावा, स्वस्तिक ग्रुप- तन्वी मिथुन जाधव (नुने- भाकरवाडी) यांच्या बैलगाडीने सातवा आणि आई तुळजाभवानी प्रसन्न बळिराम आप्पा शेळके- अक्षय शिंदे कोरेगाव यांच्या बैलगाडीने आठवा क्रमांक मिळवला. विजेत्या बैलगाड्यांना रोख रक्कम आणि ढाली बक्षीस देण्यात आल्या. शर्यतीचे संयोजन शिवसेनेचे
कोरेगाव शहरप्रमुख अक्षय संजय बर्गे, पदाधिकारी, शिवसैनिकांनी यशस्वीपणे केले. त्यांना चौथाईसह शहरातील अनेक विभागांतील युवक, नागरिकांनी सहकार्य केले. दरम्यान, शर्यतीस्थळी महाराष्ट्र विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार शशिकांत शिंदे, शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे पाटील, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सचिन मोहिते आदींनी भेट देऊन शर्यत संयोजनाबद्दल शहरप्रमुख अक्षय बगें व त्यांच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
COMMENTS