सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुणे : प्रतिनिधी
भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त दोन दिवसात कुंजरगड, कोथळे भैरवगड, हरिश्चंद्रगड, कलाडगड, शिरपुंजे भैरवगड आणि पाबरगड हे सहा गड किल्ले सर करीत आडवाटेची तब्बल ५४ किलोमीटरची पायपीट करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी भारतीय तिरंग्यास मानवंदना दिली आणि केलेली ही तंगडतोड भटकंती गड संवर्धन करणाऱ्या दुर्ग सेवकांना समर्पित केली.
या भटकंतीचा शुभारंभ सकाळी सहा वाजता पिचडवस्ती, ता.अकोले, जि.अ.नगर येथुन शिवगर्जना देत झाला. सव्वा तासांची पायपीट केल्यावर पहिल्यांदा कुंजरगड सर करण्यात आला. येथील ऐतिहासिक वास्तुंना भेट दिल्यावर गड उतार होऊन घाटवाटेवरून विरुद्ध दिशेला असलेल्या कोथळे गावाच्या बाजुने उतार होऊन पुढे भैरवगड सर करण्यात आला. येथे भैरवनाथा चरणी नतमस्तक झाल्यावर गड उतारास सुरवात करण्यात आली. अर्ध गड उतार होऊन डाव्या बाजुस एक वळसा घेत एका मोठ्या मळलेल्या पायवाटेने टोलार खिंडीत पोहोचता येते. पुढे हरिश्चंद्रगडावरील हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोर सर्व नतमस्तक झाले. येथुन बैलघाट मार्गे गड उतार होऊन खड्या चढाईचा कलाडगड सर करण्यात आला. गड उतार होण्यास अंधार झाल्यावर पाचनई येथे पहिल्या दिवसाचा मुक्काम करण्यात आला.
दुसऱ्या दिवशी सकाळी कोपतरेवस्ती मार्गे शिरपुंजे भैरवगड सर करण्यात आला. वास्तुंना भेट दिल्यावर शिरपुंजे मार्गे गड उतार होण्यात आले. येथुन पहिल्यांदा सिंदोळा डोंगर सर करण्यात आला आणि नंतर घनदाट जंगलातुन मार्गस्त होत खड्या चढाईचा पाबरगड सर करण्यात आला. येथील गड वास्तुंना भेट दिल्यावर तिरंगा फडकावून राष्ट्रगीत गाण्यात आले. येथुन गड उतार होऊन तेरुंगल गाव, ता.अकोले, जि.अ.नगर येथे मोहिमेची सांगता झाली. पहिल्या दिवसाच्या भटकंतीमध्ये तब्बल ३५ किलोमीटरची पायपीट १३ तासात करण्यात आली तर दुसऱ्या दिवशी १९ किलोमीटरची पायपीट ११ तासात करण्यात आली. अश्या प्रकारे या वर्षीच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दुर्गम गड किल्ले आणि घाटवाटेच्या तब्बल ५४ किलोमीटरची पायपीट करून तिरंग्यास मानवंदना देण्याचा मान टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सला मिळाला.