सोमेश्वर रिपोर्टर टीम-------
सुपे : दीपक जाधव
शेतकऱ्यांनी आपआपल्या भागात पाणी वापर संस्था सक्षम करुन जनाई उपसा सिंचन योजना लोकाभिमुख करावी असे प्रतिपादन पुरंधरचे आमदार संजय जगताप यांनी केले.
सुपे येथील ग्रामसचिवालयासमोर शेतकरी संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष पोपट खैरे, सदस्य सचिन साळुंके आणि भानुदास बोरकर आदी तिघांनी ' जनाई ' च्या हक्काच्या पाण्यासाठी २६ जानेवारीपासुन सुरु केलेल्या आमरण उपोषणाचा तिसरा दिवस आहे. त्यास जाहिर पाठिंबा म्हणुन जगताप बोलत होते.
यावेळी जगताप यांनी ही योजनेंतर्गत बारामती, दौंड आणि पुरंधरमधील गावे येत असल्याने ही योजना सक्षमपणे चालली पाहिजे. शेतकऱ्यांनी पाणी वापर संस्था सक्षम केल्यास जनाई योजना लोकाभिमुख होईल असे सांगुन आपल्या मागण्या शासनापर्यत पोहचविणार असल्याचे जगताप यांनी सांगितले.
दरम्यान भाजपचे जिल्हा अध्यक्ष वासुदेव काळे यांनी उपोषणस्थळी भेट देवुन मी आपल्या सोबत असल्याचे सांगितले.
जनाई लाभक्षेत्रातील प्रत्येक गावातील वेगवेगळे शेतकरी दररोज चक्री उपोषण करीत आहेत.
दररोज सकाळी दहापासुन उपोषणस्थळी या योजनेच्या लाभक्षेत्रातील शेतकरी, महिला आणि जेष्ठ नागरिकांची उपस्थिती मोठ्या संख्येने वाढत राहते. यावेळी काही मान्यवरांची भाषणे तसेच या योजनेची माहिती देण्याचे काम सुरु असते. रविवारी ( दि.२८ ) दुपारी काऱ्हाटी शाळेतील एका विद्यार्थीनीने शेतकरी राजाची होत असलेली दशा तिने आपल्या भाषणातुन व्यक्त केली. त्यानंतर हभप करंजुलेमहाराज यांचे संगित प्रवचन झाले. तर संध्याकाळी प्रत्येक दिवशी एका गावातील भजनी मंडळाचा भजनाचा कार्यक्रम होत आहे.
दरम्यान उपोषणस्थळी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रज्योत खडके यांनी उपोषण कर्त्यांची वैद्यकिय तपासणी केली. यावेळी यातील सचिन साळुंके या उपोषण कर्त्याचा रक्तदाब कमी झालेला जानवताच औषधे घेण्याचा सल्ला दिला.
यावेळी उपोषणस्थळी सुपे, काळखैरेवाडी, पानसरेवाडी, चांदगुडेवाडी, भोंडवेवाडी, कुतवळवाडी, वढाणे, नारोळी, कोळोली, देऊळगाव रसाळ, काऱ्हाटी, बाबुर्डी, पुरंदर तालुक्यातील नायगाव, राजुरी, रिसे, पिसे आदी गावातील लाभधारक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित राहुन पाठींबा दर्शवित आहेत.
..................................