सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
हडपसर-मांजरी : महेश जगताप
महाराष्ट्र एकूण ऊस उत्पादनात चांगला आहे मात्र एकरी ऊस उत्पादन सुधारणा अवश्यक आहे. दर्जेदार बियाण्यांचा अभाव, हवामान बदल, पाणी व्यवस्थापन नसणं, मातीची झीज, वारंवार जमिनीत एक पीक घेण्याने मातीचा घसरलेला पोत यामुळे एकरी उत्पादन घटले आहे. ऊस उत्पादन वाढीसाठी शुद्ध बियाणे वापरणे आवश्यक असल्याचे मत खासदार शरद पवार यांनी व्यक्त केले.
मांजरी- हडपसर पुणे याठिकाणी ते वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या ४७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षीय भाषणात बोलत होते. यावेळी संघाचे उपाध्यक्ष दिलीप वळसे जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, साखर संघ अध्यक्ष पी, आर पाटील, विजयसिंह मोहिते पाटील, विश्वजीत कदम, बाळासाहेब पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. पवार पुढे म्हणाले, चांगल्या ऊस बेणेसाठी व्हिएसआयकडून 150 एकर क्षेत्र बियाणे उत्पादन करण्यासाठी वापरले जाते. व्हिएसआयकडून 2021 मध्ये पाथरगावं येथे संशोधन केंद्र उभारले असून तिथे उत्तम बियाणे उत्पादन होणार आहे. नागपूर येथे थोड्याच दिवसात विदर्भासाठी व्हीएसआय दुसरे केंद्र सुरू होईल. व्हिएसआयची उत्पादने शेतकऱ्यांना पोचवा त्यामुळे शेतकऱ्यांचे उत्पादन वाढेल. तसेच उसाची यांत्रिक पद्धतीने तोडणी यापुढे आवश्यक आहे, असेही पवार म्हणाले. देशात 2025 मध्ये 20 टक्के इथेनॉल ब्लेंडिंग साठी प्रयत्न आहेत. 2013-14 मध्ये 1.5 टक्के ब्लेंडिंग करताना 38 कोटी लिटर उत्पादन झाले. 2023 मध्ये 12 टक्के म्हणजे 502 कोटी लिटर उत्पादन झाले. यामुळे यामुळे देशाची अर्थकारण सुधारण्यास मदत झाली व शेतकऱ्यांची थकबाकी कमी झाली. 2023 मध्ये इथेनॉलनिर्मितीसाठी सिरप वापरायला बंधन घातली. मात्र साखरसंघामार्फत पाठपुरावा केल्याने सुधारित अध्यादेश निघाला. आता 17 लाख टन साखर इथेनॉल साठी वापरली जाईल. स्पेन्ट वॉशपासून कारखान्यांनी CNG व CBG गॅस प्रकल्प तयार करावेत, असे आवाहनही त्यांनी केले.
तसेच सन 2023-24 मध्ये भारतात एकूण 317 लाख टन साखर निर्माण होईल असा सुधारित अंदाज आहे. मागील वर्षी 329 लाख टन उत्पादन होते. त्यापैकी 61 लाख साखर टन निर्यात केली तर 45 लाख टन इथेनॉल निर्मितीसाठी वापरली. असल्याचे पवार यांनी सांगितले.