सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
इस्लामपूर : तैसीन आत्तार
येथील प्रसिद्ध कवी प्रदीप पाटील यांच्या 'अंतरीचा भेद' या कवितासंग्रहाची सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मराठी विभागाच्या एमए च्या अभ्यासक्रमामध्ये निवड करण्यात आली आहे.
साहित्य कृतीचा भाषालक्षी अभ्यास या आवश्यक अभ्यास पत्रिकेमध्ये प्रभाकर पणशीकर 'आठवणीतील मोती', गो. नी. दांडेकर 'पूर्णामायची लेकरं', आसाराम लोमटे 'आलोक' आणि प्रदीप पाटील यांचा 'अंतरीचा भेद' या 'आत्मसंवाद 'नंतरचा 'अंतरीचा भेद' हा त्यांचा दुसरा कवितासंग्रह आहे. गेली अनेक वर्षे ते सातत्याने प्रतिष्ठित वाड्.मयीन नियतकालिकांतून काव्यलेखन करतात. त्यांच्या दोन कादंबऱ्या, काही कथाही प्रकाशित झालेल्या आहेत. नव्वद नंतरचे मराठी साहित्यातील महत्त्वाचे कवी म्हणून प्रदीप पाटील ओळखले जातात. दिलीप पुरुषोत्तम चित्रेपासून डॉ. जगदीश कदम यांच्यापर्यंत अनेक मान्यवरांनी त्यांच्या कवितेची
केलेली समीक्षा लवकरच ग्रंथरुपाने येते आहे. महाराष्ट्रातील इयत्ता नववीच्या, कर्नाटकातील इयत्ता बारावीच्या शालेय अभ्यासक्रमांमध्ये आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या 'विद्यापीठांच्या अभ्यासक्रमांमध्येही यापूर्वी त्यांच्या कविता समाविष्ट झालेल्या आहेत. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर मराठी गंभीर कविता पोहोचविण्यासाठी त्यांनी 'आमचे जगणे आमची कविता' या कार्यक्रमाची निर्मिती केली. प्रा. पाटील हे महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे सदस्य असून आविष्कार कल्चरल ग्रुपचे कार्याध्यक्ष आहेत.