सोमेश्वर रिपोर्टर टीम------
पुणे : प्रतिनिधी
छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्यावरील कार्यकारी संचालक यांच्यावर झालेल्या प्रकरणी तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणी
महाराष्ट्र स्टेट शुगर फॅक्टरी मॅनेजिंग डायरेक्टर्स असोसिएशन पुणे यांनी साखर आयुक्त यांच्याकडे केली आहे.
याबाबत असोसिएशनचे साखर आयुक्त यांना दिलेल्या पत्रात म्हणटले आहे की, महाराष्ट्र राज्यामध्ये सर्वच सहकारी साखर कारखान्यामध्ये कार्यरत असणारे कार्यकारी संचालक हे महाराष्ट्र शासनाच्या पॅनेल वरील नियुक्त झालेले कार्यकारी संचालक असून हे पद अत्यंत महत्त्वाचे व सन्मानाचे समजले जाते.
कारखान्यामधील हजारो कर्मचारी, हजारो तोडणी वाहतूकदार, हजारो ऊस उत्पादक शेतकरी, शेकडो मालपुरवठादार व्यापारी तसेच कारखानदारीवर अवलंबून असणारे अनेक छोटे-मोठे उद्योगधंदे चालवणारे हजारो व्यवसायिक तसेच कारखाना व्यवस्थापन व शासन यांच्यामधील महत्त्वपूर्ण दुवा म्हणून कार्यकारी संचालक आपले कार्य करीत असतात.
परंतु अलीकडील काळामध्ये कार्यकारी संचालक या पदास कोणतेही संरक्षण नसल्यामुळे अत्यंत निंदनीय अशा घटना घडत आहेत. यामध्ये कार्यकारी संचालक यांना शिवीगाळ करणे, ब्लॅकमेलिंग करणे, दमदाटी करणे, मारहाण करणे अशा अनेक घटना घडत आहेत. यामधील एक घटना म्हणजे काल छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखानामध्ये कार्यकारी संचालक श्री चिटणीस यांना अमानुषपणे मारहाण करण्यात आलेली आहे. यामध्ये खऱ्या अर्थाने राजकीय कारण असल्याचे प्रथमदर्शनी स्पष्ट होत आहे. अशा स्वरूपाने राजकीय सुडापोटी कार्यकारी संचालक यांना मारहाण करणे ही बाब खेदजनक व निंदनीय आहे. महाराष्ट्र राज्य कार्यकारी संचालक असोसिएशन मार्फत या घटनेचा आम्ही तीव्र निषेध करीत असून याबाबत आपण संबंधितावर सत्वर कार्यवाही करणेबाबत सूचना देणे आवश्यक आहे. अन्यथा सर्व कार्यकारी संचालक ज्यांनी आजपर्यंत कधीही कसलाही संप, आंदोलन केले नाही त्यांना काम बंद आंदोलन करून आपल्या कार्यालयासमोर न्याय मागण्यासाठी उपोषण करावे लागेल.
तरी कृपया आपणास मनःपूर्वक विनंती करीत आहोत की या घटनेबाबत सत्वर चौकशी करून दोषीवर कारवाई करण्याकरीता योग्य ती पूर्तता करावी व कार्यकारी संचालक यांना अशा बाबतीत संरक्षण देणे करिता कायदेशीर तरतूद करावी ही नम्र विनंती.