सोमेश्वर रिपोर्टर टीम----
मेढा - ओंकार साखरे
बलशाली राष्ट्र घडविणारी पिढी निर्माण करायची असेल तरं शिक्षणा बरोबरचं संस्कारही महत्वाचे असून आई-वडील, पालक जितके महत्वाचे घटक आहेत त्याहूनही अधिक जबाबदारी ही गुरूजनांची असल्याचे सांगून शाळांमधूनच संस्कारीत पिढी निर्माण होत असते. बालवयात मिळालेले संस्कार आयुष्य घडविण्यास मोलाचे असते. मी ही ग्रामीण भागातून आलो असून जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतले असल्याचे प्रतिपादन मेढा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.संतोष तासगावकर यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा जवळवाडी येथिल कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
जवळवाडी ता.जावली येथिल माजी सरपंच वर्षा जवळ यांच्या संकल्पनेतून व हमीराराम देवाशी यांच्या सौजन्याने जि.प.शाळेतील विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व खाऊ वाटप करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात मेढा पोलिस स्टेशनचे स.पो.नि.संतोष तासगावकर,सरपंच सुरेखा मर्ढेकर,उपसरपंच शंकरराव जवळ,सुरेशबुवा जवळ, सदाशिव जवळ,सुजाता मर्ढेकर,हरिभाऊ जवळ, अशोक जवळ, शंकर जवळ,इ.मान्यवर व पालक, महिला ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना तासगावकर म्हणाले शाळा ही शिक्षणाची मंदिरे असून शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या जीवनाला आकार देणारे मुर्तीकार असतात. चिखलाच्या गोळ्याला आकार देवू तशी मुर्ती तयार होते त्याप्रमाणे बालवयात विद्यार्थ्यांना शाळेतून मिळालेले संस्कार विद्यार्थ्यांचे जीवन घडवितात. जवळवाडी गाव नेहमीच लोकसभागातून अनेक उपक्रम राबवित असून शाळेकडे ग्रामस्थ विशेष लक्ष देतात हे कौतुकास्पद व आदर्शवत असल्याचे गौरवोदगार त्यांनी काढले.
जुन महिन्यापासून नविन आलेल्या मुख्याध्यापिका अनिता जाधव व शिक्षक संदिप सुतार यांनी विद्यार्थ्यांमध्ये केलेला बदल याची जाणीव ग्रामस्थांना होत असून हस्तलिखीत स्पर्धेमध्ये तालुक्यातून यश मिळाल्याने ग्रामस्थांच्या अपेक्षा उंचावल्याच्या भावना यावेळी सरपंच सुरेखा मर्ढेकर यांनी व्यक्त केल्या.
यावेळी मुख्याध्यापिका अनिता जाधव,शिक्षक संदिप सुतार यांनीही मनोगते व्यक्त करून ग्रामस्थांचा सहभाग प्रेरणादायी असल्याचे सांगितले.यावेळी शिक्षकांचा सत्कार करण्यात आला व शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना स्पोर्ट ड्रेस व खाऊ वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन विलासबाबा जवळ यांनी केले तर आभार सुरेशबुवा जवळ यांनी मानले.