सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सुपे : दीपक जाधव
बारामती तालुक्यातील सुपे येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी नृत्यमल्हार राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला.
या नृत्यमल्हार राज्यस्तरीय लोकनृत्य स्पर्धा येरवडा येथील लोकशाहीर अण्णा भाऊ साठे सभागृहामध्ये १७ ते २१ जानेवारी या कालावधीत पार पडल्या. या स्पर्धेचे आयोजन बाळासाहेब नागवडे यांच्यासह नृत्यमल्हार मधील चमूने केले होते.
पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत सुपे येथील श्री शहाजी माध्य. व उच्च माध्य. विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळविले.
तसेच हडपसरच्या अण्णासाहेब मगर महाविद्यालयात झालेल्या बुद्धिबळ स्पर्धेत अनुष्का बापू कुतवळ हिने १७ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला. तसेच चेन्नई येथे झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत या अनुष्काने सुवर्णपदक पटकाविल्याची माहिती प्राचार्या एस. ए. लोणकर यांनी दिली.
खराडी येथील तुकाराम धोंडिबा पठारे महाविद्यालयात झालेल्या कुस्ती स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातून संग्राम राजेंद्र कुतवळ याने ९२ किलो वजन गटात आणि सार्थक विठ्ठल रेवडे ४८ किलो वजन गटात द्वितीय क्रमांक मिळविला.
सासवडच्या वाघिरे महाविद्यालयात झालेल्या खो-खो स्पर्धेत मुलींच्या संघाने संस्थेत प्रथम क्रमांक पटकावला. तर मुलांच्या संघाने द्वितीय क्रमांक मिळविला. यावेळी झालेल्या गोळाफेक स्पर्धेत संग्राम राजेंद्र कुतवळ याने १७ वर्षे वयोगटात द्वितीय क्रमांक, तर संस्कार प्रकाश भोंडवे याने १९ वर्षे वयोगटात प्रथम क्रमांक मिळवला. या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेदरम्यान विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे देखील आयोजन केले होते. त्यामध्ये विद्यार्थिनींनी सादर केलेल्या नृत्याला उपस्थितांची दाद मिळाली.
क्रीडा स्पर्धांमधील सर्व खेळाडूंना क्रीडाविभागप्रमुख आर. बी. दुर्गे आणि क्रीडाशिक्षक पी. पी. शेंडगे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी खेळाडूंचे प्राचार्या एस. ए. लोणकर, पर्यवेक्षक बी. के. भालेराव तसेच शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, पालक, ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. व पुढील उज्ज्वल भविष्याकरिता शुभेच्छा दिल्या.