सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
शासनाकडून वृक्ष लागवडीची सक्ती केली जात असताना निसर्ग संपत्तीने नटलेल्या आणि वन औषधी असलेल्या जावली तालुक्यात वृक्ष तोडीचा हौदोस मांडला जात असून राजरोसपणे झाडांची कत्तल होताना दिसत आहे. त्यामुळे वन विभागाच्या आशिर्वादाने वन संपत्तीचा नाश होवू पहात आहे. याकडे वरीष्ट अधिकारी निव्वळ बघ्याचीच भुमिका पार पाडणार का ? असा प्रश्न जनसामान्यांना पडला आहे.
जावली तालुका म्हणजे निसर्ग संपत्तीचा खजाना असुन विविध प्रकारच्या औषधी वनस्पती येथिल जंगलात सापडत असताना सध्या खैर, सावर , यासह इतर झाडांची तोडणीची लगबग सुरु आहे. सामान्य शेतकऱ्यांना पैशाचे अमिष दाखवुन आणि वन विभाग आमच्या खिशात असल्याचे भासवून व्यापारी आणि दलाल संगनमताने झाडांवर डल्ला मारताना दिसत आहेत.
वृक्ष तोडीचा पर्जन्यमानावर परिणाम झाल्याने एकीकडे शेतकरी चिंता व्यक्त करीत आहे तर दुसरीकडे व्यापारी व दलाल यांच्या भुलभुलैयाला बळी पडून पैशाच्या आमिषाला शेतकरी फसत आहेत.
तालुक्यातील वन विभागाकडून गांधारीची भुमिका पार पाडली जात असताना वरिष्ट कार्यालय मात्र दुर्लक्ष करताना दिसत आहे. वरिष्ठ अधिकार्यांच्या हलगर्जीपणाचा आधार तालुका वन कार्यालय घेत असल्याने आर्थिक मांडवलीचा खेळ राजरोसपणे सुरु आहे.
जावली तालुक्यातील वन संपदा आर्थिक मांडवलीतुन संपुष्ठात येण्याचा धोका निर्माण झाला असून याकडे लक्ष कोण देणार असा प्रश्न निर्माण होत आहे. सांगवी, भामघर असो कि या विभागातील कोणतेही गाव असो तेथिल डोंगर वृक्ष तोडीमुळे ओसाड दिसु लागले आहेत आणि यास वनविभाग जबाबर असल्याचे जनतेचे म्हणणे आहे.
तालुक्यातील वृक्ष तोडीला आळा बसणार का ? असा प्रश्न उपस्थित होत असताना काहींना पाठीशी घालण्यासाठी वन अधिकारी कागदी घोडे नाचवुन केलेल्या अभिनंदनिय कामगिरीवर खुष होताना दिसत आहेत. हिरडा, साग, चिंच, आंबा , फणस , खैर, चंदन, ऐन , अंजन, जांभूळ आदी झाडांना शासनाने तोडण्यास मज्जाव केला आहे. महसूल व वन विभाग क्र. टी आर एस ,1169/187626/ बी दि. ७ डिसेबर १९७० ने खैर विना परवानगी तोडण्यास मज्जाव केला असताना खैरांची खैरीयत वाटल्यावाणी तोड सुरु कोणाच्या परवानगीने होतेय हा प्रश्न निर्माण होत आहे. खैराची वन संपत्ती संपण्याच्या मार्गावर असून याला पायबंद घातला जाणार का ? असा प्रश्न पत्रकारांना समाजातून विचारला जात आहे.
COMMENTS