सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आजअखेर १०६ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९ हजार मे. टनाने गाळप करीत एकूण ९ लाख ४७ हजार ८४ मे.टन ऊसाचे गाळप केले असून यामधून जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.६२ टक्के साखर उतारा राखत १० लाख ९६ हजार क्विटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणी वाहतूकीचे योग्य व चांगल्या प्रकारचे नियोजन केल्यामुळे संपुर्ण पुणे जिल्ह्यात कारखान्याने क्रमांक एकचा साखर उतारा राखत आज अखेरचे गाळप पूर्ण केले असल्याची माहिती श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हंटले आहे की, कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासद व बिगर सभासद यांच्या जानेवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन .७५ रुपये फेब्रुवारीमध्ये तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन.१०० रुपये तर मार्च नंतर हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्रति मे.टन १५० रुपये असे प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून, त्यामुळे कार्यक्षेत्रातील शेतकऱ्यांना जानेवारीमध्ये रु.३ हजार ७५ रुपये फेब्रुवारीमध्ये ३ हजार १०० रुपये तर मार्चपासून तुटणाऱ्या ऊसास ३ हजार १५० रुपये प्रति टन अशी एकरकमी उचल मिळणार आहे. तसेच जगताप पुढे म्हणाले की, पुढील हंगामात तुटणाऱ्या खोडवा ऊसासाठी कारखान्याने प्रति मे.टन १५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून चालू लागण हंगामातील सुरु ऊसाच्या लागवडीसाठी प्रति मे.टन १५० रुपये अनुदान देणेचा निर्णय घेणेत आलेला आहे. जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांचे व बिगर सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटीबद्ध असून गाळप पुर्ण करत असताना जिराईत भागातील पुर्व हंगामी ऊस तोडीस प्राधान्य देत असताना कार्यक्षेत्रातील संपुर्ण आडसाली हंगामातील ऊस माहे फेब्रुवारी अखेर संपविण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुचनेनुसार पुरंदर उपसा सिंचन योजनेची दुरुस्ती करण्यासाठी कारखान्याचा इलेक्ट्रीकल व मॅकॅनिकल स्टाफची मदत गेली २० दिवस दिली असल्यामुळे येत्या दोनच दिवसात पुरंदर उपसा सिंचन योजना अजित पवार यांच्या सहकार्यामुळे चालू होण्यास मदत झालेली आहे. तरी कारखान्याच्या सभासद शेतकऱ्यांनी आपला ऊस सोमेश्वर कारखान्यासच गाळपास देवून सहकार्य करावे अशी विनंती जगताप यांनी केला आहे.
COMMENTS