सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करीत 'अपघातमुक्त हंगाम' ही संकल्पना राबवावी. अपघात टाळण्यासाठी सर्व वाहनांना रिफ्लेक्टर बसवावेत. वाहनचालकांनी वाहनांची सर्व कागदपत्रे पूर्ण करावीत. क्षमतेपेक्षा अधिकचा ऊस वाहतूक करू नये असे आवाहन
बारामतीचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राजेंद्र केसकर यांनी केले. 'सोमेश्वर माझा, अभिमान माझा' याअंतर्गत उसाची वाहतूक करणाऱ्या वाहनांना रिफ्लेक्टर बसविण्याची सुरुवात करण्यात आली.
'सोमेश्वर' कारखान्याच्या गाडीतळावर रस्ता सुरक्षा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी केसकर यांनी ऊस वाहतूकदारांशी संवाद साधला. यावेळी मोटर वाहन निरीक्षक सुरज पाटील, सोमेश्वर कारखान्याचे संचालक किसन तांबे, जितेंद्र निगडे, लक्ष्मण गोफणे यांच्या सतीश काकडे, वाहतूक संघटनेचे कैलास मगर, सागर वायाळ, किशोर शेळके, प्रदीप कणसे शेतकरी आणि वाहनचालक उपस्थित होते. यावेळी केसकर यांच्या उपस्थितीत ऊसाची वाहतूक करणाऱ्या सर्व वाहनांना लाल, पिवळे आणि पांढऱ्या रंगाचे रिफ्लेक्टर बसविण्यास सुरुवात करण्यात आली.वाहनांना रिफ्लेक्टर बसवून अपघात टाळावेत. रिफ्लेक्टरमुळे रात्रीच्या वेळी होणारे अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होणार आहे.
ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर -ट्रेलर रजिस्ट्रेशन करून त्याचा विमा उतरवा. रस्त्यावर अपघात होऊ नये यासाठी वाहतूक नियमानुसार सुरक्षित वाहने चालवावीत अन्यथा वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा यावेळी केसकर यांनी दिला.
सोमेश्वर कारखान्याचा गाळप हंगाम सुरळीत सुरू असून कारखाना कार्यक्षेत्रात आत्तापर्यंत एकही अपघात झाला नसल्याने राजेंद्र केसकर यांनी ऊस वाहतूक संघटनेचे अभिनंदन केले. दरम्यान केसकर यांनी सोमेश्वर विद्या प्रतिष्ठान विद्यालयात जात रस्ता सुरक्षा वाहतूक संदर्भात विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनांची तपासणी करत वाहन चालकांना सूचना दिल्या.