सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
कवी मनाचे प्रतिबिंब, प्रादेशिकता, वैचारिकता, अभिरुची हे गुण "काव्यप्रतिभा" या राज्यस्तरीय प्रातिनिधिक कवितासंग्रहा मधील सहभागी कवींच्या कवितांमधून दिसून येतात.
ध्यासातून आणि श्वासातून कविता साकारलेली असते. अंतर्मनाचा हुंकार शब्दांचे लेणी होऊन प्रकटतात. तेव्हा साहित्यकृतीची निर्मिती झालेली असते. त्याला "सृजनशीलता" असे म्हणतात.
त्याचा प्रत्यय या कवितासंग्रहातील कविता वाचल्यानंतर येतो. शून्यातून अनंताकडे सहज प्रवास करणाऱ्या प्रतिभेच्या अव्यक्त रूपाची अनुभूती घ्यावी लागते.
कल्पकता, वास्तवता आणि ध्येयासक्तीचा संगम कवितेतून दिसतो. असे मत बारामती तालुका ग्रामीण पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष अॅड. गणेश आळंदीकर यांनी व्यक्त केले.
साहित्यप्रेमी मंडळ सोमेश्वरनगर या साहित्य संस्थेच्या वतीने संपादित करण्यात आलेल्या १९ व्या "काव्यप्रतिभा" या कवितासंग्रहाचे प्रकाशन
"दैनंदिन जीवनातील कायदे नवनवीन दुरुस्त्यांसह" या कायदेविषयक पुस्तकाचे लेखक अॅड. गणेश आळंदीकर यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
याप्रसंगी सामाजिक कार्यकर्ते- राकेश गायकवाड, राहुल शिरसाट,बजाज फायनान्स चे ब्रॅ्ंच मॅनेजर अक्षय कांबळे,ऋषिकेश लोणकर, निक्सा फायनान्स चे सी.ई.ओ निखिल गायकवाड उपस्थित होते.
"काव्यप्रतिभा" हा कवितासंग्रह स्नेहवर्धन प्रकाशन पुणे या आंतरराष्ट्रीय प्रकाशन संस्थेतून प्रकाशित करण्यात आलेला आहे. ज्येष्ठ साहित्यिक व मराठी भाषेच्या अभ्यासक डॉ. लीला गोविलकर यांनी अभ्यासपूर्ण प्रस्तावना लिहिलेली आहे.
तसेच सुप्रसिद्ध ज्येष्ठ वृत्त निवेदिका, लेखिका, कवयित्री, गायिका, चित्रकार आणि रयतेचा दरबार च्या सर्वेसर्वा स्वाती पाटणकर यांच्या अष्टपैलू काव्यप्रतिभेस हा कवितासंग्रह अर्पण करण्यात आलेला आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन साहित्यप्रेमी मंडळाचे अध्यक्ष प्रा. हनुमंत माने यांनी केले.