सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
मुगुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर, बारामती. येथे मराठी विभागाच्या वतीने कविश्रेष्ठ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्ताने मराठी भाषा गौरवदिन साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे यांनी कविवर्य कुसुमाग्रज यांच्या प्रतिमेचे पूजन करून केले. मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी त्यांच्या प्रास्ताविकामध्ये म्हणाल्या की, "एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की भाषा संपली की संस्कृती संपणार; संस्कृती संपली की माणूस संपणार आहे; आणि माणूस संपला म्हणजे समाज संपणार आहे. आपला माणूस, आपला समाज, आपली संस्कृती टिकवायची असेल तर आपल्याला भाषा ही टिकवावीच लागणार आहे. हे वास्तव आपण स्वीकारावे, अंमलात आणावे. केवळ एक दिवस नाहीतर प्रत्येक दिवस हा आपल्या मायबोलीचाच मानला गेला पाहिजे. शासनाबरोबर मराठी भाषा टिकवणे आणि ती अधिकाधिक समृद्ध करणे ही आपलीही जबाबदारी आहे." मार्गदर्शक वक्ते म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देविदास वायदंडे उपस्थित होते. यांनी ''मराठी भाषेतील नवे संदर्भ" या विषयावर अतिशय अभ्यासपूर्ण आणि सोप्या शैलीत मराठीच्या अस्तित्वाचा आणि भवितव्याचा वेध घेतला. ते म्हणाले की, "आज आपण सगळेच म्हणजे अगदी सगळेच जागतिकीकरणाच्या एका विशिष्ट टप्प्यातून मार्गक्रमण करतोय. हे मार्गक्रमण करत असताना आजची आपली नवीन पिढी भरकटल्यासारखी झाली आहे; म्हणजे आपल्या संस्कृतीपासून, आपल्या मराठी भाषेपासून दूर जात आहे. म्हणूनच आपल्याला मराठी भाषा गौरव दिनासारखे कार्यक्रम घ्यावे लागतात. कुठलीही भाषा ही विशिष्ट सामाजिक संदर्भातून तयार होते. भाषेचे संदर्भ काळानुसार बदलत जातात. आणि हे परिवर्तन म्हणजे तिच्यातील जिवंतपणाचे लक्षण आहे. संगणकाची भाषा, इंटरनेट आणि मोबाईलची भाषा, कृषी संस्कृतीची भाषा आणि त्यातील संदर्भ काळानुसार कसे बदलले आहेत, हे त्यांनी अनेक उदाहरणे देऊन स्पष्ट केले.
या संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.प्रवीण ताटे देशमुख यांनी केले. आभार प्रा. निलम देवकाते यांनी मानले. कार्यक्रमाचे संयोजन मराठी विभाग प्रमुख डॉ. जया कदम यांनी केले. संपूर्ण कार्यक्रम यशस्वीतेसाठी डॉ. जवाहर चौधरी, डॉ निलेश आढाव, डॉ. श्रीकांत घाडगे, डॉ. नारायण राजुरवार, डॉ. दत्तात्रेय डुबल, प्रा.अच्युत शिंदे, डॉ. अजय दरेकर, प्रा. पोपट जाधव, डॉ. राहुल खरात, डॉ.बाळासाहेब मरगजे , डॉ. कल्याणी जगताप, प्रा.मृणालिनी यादव, प्रा. गोरख काळे, प्रा.सचिन भोसले, प्रा. अनिकेत भोसले आणि शिक्षकेतर कर्मचारी आदींनी परिश्रम घेतले.