सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
काऱ्हाटी ता. बारामती येथे बारामती टेक्स्टाईल पार्क च्या अध्यक्षा व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या बॅनरवर शाइफेक करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करावी अशी मागणी सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड यांनी केली आहे.
याबाबत ऋषीकेश गायकवाड व ज्ञानेश्वर पोमणे यांनी सुपे पोलिसांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, काऱ्हाटी येथे बारामती-पुणे रस्त्यावर सुनेत्रा पवार यांचा फोटो असलेला बॅनर उभा करण्यात आलेला होता. सदरील बॅनरवर अज्ञात समाजकंटक व्यक्तीने रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन त्या बॅनरवर शाईफेक केली असून सदरील प्रकार हा अतिशय निंदनीय आहे. आमच्या नेत्या सुनेत्रा पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून बारामती लोकसभेची निवडणूक लढावी अशी मतदारसंघातील मतदारांमधून मागणी होत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून त्यांना अद्याप अधिकृत उमेदवारी जाहीर झालेली नाही परंतु नुसत्या चर्चेने विरोधकांच्या पायाखालची वाळू सरकली असून त्यातून आलेल्या नैराश्यातून सदरील प्रकार घडलेला असून सदरील अज्ञात समाजकंटकाला शोधून त्याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल होऊन कारवाई करावी असे निवेदनात म्हटले आहे.
जिल्हा परिषदेचे माजी सदस्य भरत खैरे, सोमेश्वर कारखान्याचे संचालक ऋषिकेश गायकवाड, बाबुर्डीचे सरपंच ज्ञानेश्वर पोमणे, मुर्टी गावचे उपसरपंच किरण जगदाळे, सुपे गावचे माजी सरपंच अनिल हीरवे बाबुर्डी गावचे सरपंच दत्तात्रय ढोपरे, युवक अध्यक्ष राहुल वाबळे, राजकुमार लव्हे, दत्तात्रय कुतवळ , गोविंद भापकर आदींनी सुपे पोलीस ठाण्याचे सपोनि नागनाथ पाटील यांच्याकडे निवेदन दिले.