Baramati News ! बापरे... बोगस बचतगटाद्वारे वाणेवाडीत तब्बल सहा वर्षे चालवले रेशनिंग दुकान; प्रशासनाकडून कारवाईची मलमपट्टी, पण दुकानास अभय कायम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
ग्रामपंचायत नियमानुसार स्थानिक बचत गटाला रेशनिंग दुकान चालू करण्याची परवानगी असते. मात्र वाणेवाडी येथे पुणे जिल्ह्याच्या महसूल व पुरवठा विभागाच्या वरदहस्ताने एक बोगस बचत गट तब्बल सहा वर्षे रेशनिंग दुकान चालवत होते. ग्रामस्थांच्या आक्षेपानंतर तात्पुरते बंद करण्यात आले मात्र आता किरकोळ कारवाई करून पुन्हा रेशनिंग दुकान सुरू करण्यास परवानगी दिल्याने ग्रामस्थ संतप्त झाले आहेत.
          याबाबत वाणेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील चांदगुडे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हणटले आहे की, वाणेवाडी गावात मागील सहा वर्षापासून समृद्धी महिला बचत गटाअंतर्गत स्वस्त धान्य दुकानदार अमोल वाईकर हा व्यक्ती चालवत होता. हा व्यक्ती बारामती या ठिकाणचा रहिवाशी असून ,३५ किमी इतक्या लांब वाणेवाडीत दुकान चालवत होता. ज्या समृद्धी महिला बचत गट अंतर्गत दुकान चालवतो तो गटच बोगस आहे. त्याने स्वस्त धान्य दुकानाचा परवाना घेताना बोगस कागदपत्रे शासनास सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे दिसून येते आहे.  गटाची पंचायत समिती दफ्तरी कोणतीही नोंद नाही. तसेच बचत गटातील सभासद सुद्धा बनावट आहेत. गटाच्या चौकशी करण्याआधी आणि चौकशीनंतर वेगळेच सदस्य आहेत.
          वाणेवाडी गावाच्या तत्कालीन सरपंच उषा अशोक चौगुले यांनी गावाबाहेरील कोणताही बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देऊ नये असा ठराव घेतला होता. मात्र त्यांच्या कार्यकाळानंतर समृद्धी महिला बचत गट ,वाणेवाडी या ठिकाणी कार्यरत असल्याचे सांगून खोटा ना हरकत दाखला ग्रामपंचायत कडून मिळविला. बचत गटाचे अध्यक्ष शकुंतला बहिरमल या करंजे येथील रहिवाशी नसून सुद्धा त्यांना त्या ठिकाणचे रेशन कार्ड तहसील कार्यालय बारामती यांनी दिल्याचे दिसत आहे. तसेच सदर बोगस रेशन कार्ड मध्ये परस्पर करंजे येथील पत्ता बदलून वाणेवाडी येथील केलेला दिसत आहे.  वास्तविक वाणेवाडी गावामध्ये १५० पेक्षा जास्त महिला बचत गट कार्यरत असताना सुद्धा दुसऱ्या गावातील बोगस बचत गटाला स्वस्त धान्य दुकानाचा परवाना देण्यात आला आहे. कार्यालयातील अधिकारी यांना हाताशी धरून दुकानदार वाईकर यांनी संगनमताने बोगस कागदपत्रे शासनास सादर करून शासनाची फसवणूक केल्याचे दिसत आहे. वाईकर हा बारामती तालुक्यातील चार स्वस्त धान्य दुकाने वेगवेगळ्या ठिकाणी चालवत असून वाणेवाडीसह अन्य तीन दुकानांची सुद्धा चौकशी करण्याची मागणी वाणेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
       समृद्धी गटाच्या कागोदपत्री अध्यक्ष ह्या शकुंतला बहीरमल असून सोमेश्वरनगर येथील जिल्हा बँकेत समृद्धी बचतगटाचे असलेल्या खात्याला मात्र सुजाता बहिरमल अध्यक्ष दिसत आहेत. सदर गटाबाबत आक्षेप घेतल्यानंतर मंडळ अधिकारी यांनी अचानक तपासणी करत दुकानावर ताशेरे ओढले. जिल्हा पुरवठा अधिकारी यांनी त्या गटाची अनामत रक्कम जप्त केली मात्र गटाच्या वतीने दुकान पुन्हा सुरू करण्यास धक्कादायक रित्या परवानगी दिली आहे. यामुळे वानेवाडीकर संतप्त झाले आहेत. 
         तरी समृद्धी महिला बचत गटाचे सर्व सदस्य, दुकान चालक, बोगस कागदपत्रे देणारे महसूलचे अधिकारी व करंजेचे तलाठी यांचेवर कायदेशीर कारवाई व्हावी. अशी मागणी वाणेवाडी ग्रामस्थांनी केली आहे.
To Top