सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भाटघर धरण परिसरात शेती पंप केबल चोरीचे सत्र सुरूच असून चोरट्यांनी गुरुवार दि.१५ मध्यरात्री बारे खुर्द ता.भोर येथील शेतीच्या पाण्यासाठी आवश्यक असणा-या शेतीपंपाच्या (मोटरच्या) ५०० फुटू केबल चोरल्याची घटना घडली.
बारे खुर्द मधील दत्तनगर(खुटवड वस्ती) येथील शेतकरी शांताराम शंकर खुटवड व इतर खातेदार आणि प्रकाश नारायण खुटवड व इतर यांची शेत जमीन धरण परिसरातील वेळवंडी नदी किनारी आहे. शेतात ज्वारी,गहू, हरभरा अशी रब्बी पीक आहे. शेतीसाठी लागणाऱ्या पाण्याची सोय म्हणून त्यांनी शेतीपंप पाण्यात सोडले आहेत. विजेवर चालणाऱ्या या शेतीपंपासाठी अंदाजे ४०० ते ५०० फुट कॉपर (तांब्याची) केबल त्यासाठी लावली होती. केबल चोरट्यांनी गुरूवारी रात्री सोलून, तुकडे करून पळविली असल्याने शेतकऱ्यांचे पन्नास हजाराहून अधिक नुकसान झाले आहे.मागील वर्षीही याच गावचे शेतकरी अनिल चंदनशिव यांची ७०० फुट विद्युततार केबल चोरीला गेली होती.तसेच मागील महिन्यात पसुरेतील शेतीपंप पाण्यातील मोटरच चोरट्यांनी लंपास केली होती. वेळवंड खो-यासह तालुक्यात अशा चोरीच्या घटना वाढल्या असुन पोलिसांनी रात्रीची गस्त वाढवावी व गावा- गावातुन पोलीस पाटील, पोलीस मित्र यांनाही गस्तीच्या सुचना देण्याचे शेतक-यांकडून सांगण्यात येत आहे.
COMMENTS