सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
बदलत्या जीवनशैली परालेसीस, किडनी विकार होत आहेत. त्यासाठी जीवनशैलीत बदल केला पाहिजे नियमित व्यायाम, सकस आहार घेतला पाहिजे तरच माणूस निरोगी राहू शकतो. वैद्यकीय व्यवसाय करत असताना डॉक्टरांनी स्वतःला ग ची बाधा येऊ देऊ नका. कोणत्याही गोष्टीचा अहमपणा मनाला आला तर प्रगतीची वाट खुंटते ,सकस आहार ,नियमित व्यायाम व प्रामाणिक काम तुम्हाला तणावरहित ठेवते म्हणून या गोष्टींचा अवलंब करा. असे मत बारामती येथील प्रसिद्ध हृदयरोग तज्ञ डॉक्टर रमेश भोईटे यांनी बारामती येथील कृष्ण सागर हॉलमध्ये व्यक्त केले.
बारामती सराफ असोसिएशनच्या नव्याने डॉक्टर झालेल्या तरुण-तरुणींना मार्गदर्शन व त्यांचा सत्कार डॉक्टर रमेश भोईटे व विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अतुल शहाणे यांचे हस्ते करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. बारामती सराफ असोसिएशनची वार्षिक सर्वसाधारण सभा असोसिएशन चे अध्यक्ष किरण आळंदीकर यांचे अध्यक्षतेखाली बुधवारी रात्री येथे पार पडली. त्यावेळी बारामती ,पुरंदर, दौंड, इंदापूर, श्रीगोंदा, यवत, केडगाव , चौफूला नातेपुते पाटस , इत्यादी ठिकाणचे सभासदांची मुले डॉक्टर गौरव लोळगे, डॉक्टर ऐश्वर्या लोळगे, डॉक्टर प्रतीक्षा जोजारे, डॉक्टर शिवानी मैड, डॉक्टर प्राची उदावंत, डॉक्टर यश लोळगे, डॉक्टर अबोली लोळगे, डॉक्टर सौरव लोळगे हे एमबीबीएस एमडी सारख्या पदवी घेऊन उत्तीर्ण झाले. त्याचबरोबर कमी वयामध्ये आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये सीनियर सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून पदोन्नती झालेले ऋत्विक आळंदीकर, एडवोकेट श्याम क्षीरसागर ,राज नंदिनी मालेगावकर, तालुकास्तरीवर नृत्य व गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवलेली ऐश्वर्या आळंदीकर, रील स्टार म्हणून फेमस झालेली चार वर्षाची मुलगी रेवा बोकन, प्रकाश मैड, महेश ओसवाल इत्यादींचा सत्कार डॉक्टर अतुल शहाणे यांच्या हस्ते करण्यात आला.
डॉक्टर भोईटे पुढे म्हणाले की वैद्यकीय व्यवसाय करताना सामाजिक बांधिलकी बाळगणे खूप महत्त्वाचे आहे. बारामतीच्या गिरीराज हॉस्पिटलमध्ये दर महिन्याला गोरगरीब लोकांचे शंभर ऑपरेशन मोफत पार पाडले जातात. साडेसात हजार ऑपरेशन करणारे तालुकास्तरा वरील पहिले हॉस्पिटल बारामतीचे असल्याचा आपल्याला अभिमान वाटतो. डॉक्टरांनी आजार झाल्यावर बरा होण्यापेक्षा आजार होऊ नये यासाठी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे. डॉक्टरांनी देखील वेळचे वेळी शरीराचे चेक अप करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉक्टर अतुल शहाणे यांनी कोणत्याही व्यवसायात कायदेशीर पद्धतीने काम केल्यास ताणतणाव येणार नाही. आणि बारामती ही प्रामाणिक काम करणाराला त्याचा बदला दिल्याशिवाय राहत नाही असे ते म्हणाले.
प्रास्ताविक सराफ असोसिएशनचे सचिव एबी होनमाने यांनी केले सूत्रसंचालन शिवाजी क्षीरसागर यांनी केले. राबर गणेश जोजारे यांनी मानले. यावेळी माजी अध्यक्ष रघुनाथ बागडे, प्रकाश अदापुरे, दिलीप आदापुरे, सुधीर पोतदार, गोकुळ लोळगे, गणेश मैड, नानासाहेब गडगिळे इत्यादी मान्यवर हजर होते.
COMMENTS