सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात गेल्या वर्षी पाऊस अत्यल्प झाल्याने बारामती व पुरंदरच्या गट क्रमांक तीन, चार व पाच या जिराईत भागातील ऊस क्षेत्रात पाण्याची टंचाई तीव्र झाली असून शेतकऱ्यांचे ऊस जळून चालले आहेत. ऊसाचे पर्यायाने शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत असून तोडणी नियोजनात तातडीने सुधारणा करून या भागातील ऊस तातडीने तोडून गाळपासाठी आणावा अशी मागणी भाजप नेते आणि पुणे बाजार समितीचे माजी सभापती दिलीप खैरे यांनी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याला दिलेल्या निवेदनात केली आहे.
खैरे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की जिरायती भागातील ऊस उन्हामुळे जळू लागल्याने तोडणी कामगार ऊस जाळून आणत आहेत. त्यामुळे उसाच्या वजनात घट येत आहे. तोडणी कामगारांनाही ते परवडत नसल्याने ते शेतकऱ्यांना एकरी पाच हजारापेक्षा अधिक पैसे मागत आहेत. पैसे मागितल्यास तक्रार करा असे आवाहन करून सोमेश्वरचे संचालकमंडळ मोकळे झाले आहे, मात्र शेतकरी ऊस वेळेत व नीटनेटका जावा म्हणून तक्रार करणे टाळत आहेत आणि पैसे देत आहेत. संचालक मंडळाने ऊस जाळलेल्या ठिकाणी जाऊन शेतकऱ्यांना आधार देत ऊस तोडणी यंत्रणा सक्षमपणे चालवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी खैरे यांनी केली आहे. शेतकरी होरपळत असताना त्यांच्या बांधावर जाण्याची गरज असताना उलट बहुतांश संचालक शेतकऱ्यांपासून दुरावले आहेत. कारखाना बंद झाल्यावर राजकिय व वैयक्तिक कामासाठी संचालक मंडळाने वेळ द्यावा व सध्या सभासद, शेतकऱ्यांचे अश्रू पुसवेत. शेती विभागाचे कर्मचारी-अधिकारी प्रयत्न करूनही संचालकांच्या मदतीअभावी यंत्रणा विस्कळीत झाली आहे.
...............
दुष्काळी पार्श्वभूमीवर या अडचणीच्या काळात कारखाना व्यवस्थापनाने सामंजस्यांने तोडगा काढून शेतकरी, ऊस तोडणार, वाहतूकदार यांचे नुकसान भरून काढण्यासाठी काही प्रमाणात या अतिरिक्त अनुदान द्यावे.बारामती आणि पुरंदर तालुक्यातील सर्व तोडणी कार्यक्रमांमध्ये सुधारणा करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा.
दिलीप खैरे- भाजप नेते.