सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांच्या करिता वाघळवाडी येथे ‘नक्षत्रवन’ याच्या माध्यमातून येथील वनविभागाच्या जागेत उद्यान निर्मिती करत असल्याबाबत सोमेश्वरनगर येथे झालेल्या जाहीर सभेत बोलताना राज्याचे उपमुखमंत्री अजित पवार यांनी सांगितले.
अजित पवार म्हणाले की, उद्यान निर्मिती होण्यासाठी नुकतीच राज्य शासनाच्या पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून शासन निर्णय निर्णयाद्वारे २ कोटी ५० लाख एवढ्या रकमेस प्रशासकीय मान्यता दिली आहे. यामुळे सोमेश्वरनगर परिसरातील नागरिकांना उद्यानाच्या निमित्ताने आता विरंगुळ्याचे ठिकाण उपलब्ध होणार आहे.
वाघळवाडी येथे होणाऱ्या ‘नक्षत्रवन’ या उद्यानामध्ये वन तलाव करणे, गॅबीयन वॉल बांधणे, टेहाळणीसाठी उंच मनोरे उभारणे,वन्यप्राणी प्रतिकृती बसविणे, लाकडी आभासाचे चाक, विश्रांतीस्थळ उभारणे, माहिती फलक लावणे, झाडांसाठी पाईप व ठिबक, सौरपथ दिवे अशी विविध प्रकारची कामे या उद्यानाच्या ठिकाणी होणार आहेत.
वाघळवाडीतील विद्या प्रतिष्ठान शाळेच्या मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या जागेत पर्यटनाच्या दृष्टीने या उद्यानाची निर्मिती होणार असून सोमेश्वरनगर परिसरातील गावातील नागरिकांना आता जवळच पर्यटन स्थळ विकसित होणार असल्याने उद्यानातील विविध गोष्टी अनुभवता येणार आहेत.
बारामती तालुका हा राज्यातील एक नंबरचा तालुका करणार असल्याचे राज्याचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर सभेत बोलताना सांगितले. यामुळे विकसनशील होत असलेल्या बारामतीतील सोमेश्वरनगर हे एक महत्वपूर्ण ठिकाण असल्याने या ठिकाणी होत असलेल्या उद्यानाची बाब येथील विकासात भर घालणारी पुढील काळात ठरणार आहे.
या ‘नक्षत्रवन’ या उद्यानाच्या निर्मितीसाठी तालुका वनअधिकारी शुभांगी लोणकर यांनी प्रस्ताव तयार करुन पुढील कार्यवाही करण्यासाठी प्रशासकीय बाबी पुर्ण केल्या. याकामी राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष संभाजी होळकर यांनी सहकार्य केले.
तसेच या ठिकाणी पाच हजार झाडे लावण्यासाठी झाडे उपलब्ध झाली असून सर्व झाडांच्यासाठी खड्डे सुद्धा घेण्यात आले असून या वृक्षारोपणासाठी कायमस्वरुपी पाणी देण्यासाठी श्री सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून चेअरमन पुरुषोत्तम जगताप आणि त्यांच्या संचालक मंडळाने निर्णय घेतला असून पाणी उपलब्ध करुन देण्यासाठी पाईपलाईनचे काम सुद्धा कार्यान्वित झाले असल्याने जवळपास ५० लाख लिटर क्षमता असलेले तळे या ठिकाणी करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.
-----------------
उद्यानासाठी अजितदादा पवार यांच्याकडे याबाबत अनेक वर्षापासून पाठपुरावा सुरु होता.दादांच्या माध्यमातून आता उद्यान निर्मिती ही बाब सत्यात उतरत आहे. उद्यानाचे काम आता काही दिवसात सुरु होऊन अनेक वर्षाचे असलेले स्वप्न सत्यात उतरेल.सोमेश्वरनगर परिसर आणि वाघळवाडीतील नागरिकाच्या करिता निवांतपणे जीवनातील काही क्षण व्यतिथ करता यावेत यासाठी या उद्यानाची निर्मिती व्हावी असे मनोमन वाटत होते.दादांनी यास मंजूरी दिली त्याबद्दल दादांचे भेटून आभार मानले.
अँड. हेमंत गायकवाड
सरपंच ग्रामपंचायत वाघळवाडी