सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
सुपे : प्रतिनिधी
केंद्राने विविध विकास कामे करुन राज्यात बदल घडवुन आणला. तसेच देशाच्या जडणघडणीत केंद्राचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भावनिक साद घालणाऱ्यांना यावेळी बाजुला ठेवा असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
सुपे ( ता. बारामती ) येथील उपबाजार समितीच्या नविन वास्तुचे भुमिपुजन आणि चाळणी यंत्र व छत्रपती शिवाजी सोसायटीच्या नविन वास्तुचे उद्घाटन अजित पवार यांनी केले. यावेळी माऊली गार्डन येथे झालेल्या जाहिर सभेत पवार बोलत होते.
या प्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष (अजित पवार गट) संभाजी होळकर, सोमेश्वर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम
जगताप, बारामती बँकेचे अध्यक्ष सचिन सातव, विश्वास देवकाते, भरत खैरे, सरपंच तुषार हिरवे आदींसह परिसरातील विविध संस्थांचे आजी-माजी पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
सुप्यात नव्याने घेतलेल्या २३ एकर क्षेत्रात उपबाजार समितीच्या व्यापारी गाळ्यांचे भुमिपुजन पवार यांनी केले. यावेळी सुमारे दहा कोटी रुपये खर्चाच्या व्यापारी गाळ्यांची उभारणी करण्यात येणार आहे त्याबाबतची माहिती सभापती सुनिल पवार, उपसभापती निलेश लडकत यांच्याकडुन घेतली. तसेच या आवारात झाडे लावण्याच्या सुचना त्यांनी केल्या.
छत्रपती शिवाजी महाराज सोसायटीने ४१ लाख खर्च करुन देखणी इमारत उभी केली आहे. संस्थेचे अध्यक्ष विजय चांदगुडे, जालिंदर चांदगुडे, नंदकुमार चांदगुडे, सचिव लक्ष्मण चव्हाण आदींकडून पवार यांनी बांधकामाची माहिती जाणून घेतली. जिरायती भागातुन तसेच स्वनिधीतून चांगले बांधकाम केल्याबद्दल त्यांनी पदाधिकाऱ्यांचे कौतुक केले.
जनाई, शिरसाई उपसा जलसिंचन योजनेच्या बंदिस्त पाईपलाईनसाठी टाटा कंपनीच्या माध्यमातून २ कोटी ८८ लाख खर्चाचे नियोजन करण्यात आले आहे. सद्या उन्हाळ्यामुळे पाण्याची कमतरता भासू लागली आहे त्या दृष्टीने पुरंदर उपसा व जनाई शिरसाई योजनेसाठी राखीव पाणी ठेवण्यात येणार आहे. या योजनेच्या सौर पंपाचे पॅनल उभारणी करण्याच्या दृष्टीने सुरक्षित व योग्य जागा शोधून ती आरक्षित करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले. तसेच सुपेकरांना वाहतुकीच्या कोंडीचा मनस्ताप होवु नये यासाठी विद्याप्रतिष्ठान पासुन बाह्यवळन रस्ता काढणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
गाव निहाय विकास कामांसाठी किती निधी वितरित केला व झालेली कामे यांची पुस्तिका लवकरच काढण्यात येणार आहे. अनेक विकास कामे तालुक्यात आणण्याचा प्रयत्न करतोय. त्यामुळे लोकसभेसाठी कामाच्या माणसाला न्याय द्यावा. सत्ताधारी पक्षाच्या विचाराचा खासदार निवडून द्यावा. भावनिक होऊन विधानसभेला व लोकसभेला वेगळ अस करू नका. मतदानासाठी तळ्यात मळ्यात करणाऱ्या गावाची माहिती मागवणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
.................................
COMMENTS