सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
बारामती : प्रतिनिधी
सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने १२१ दिवसांमध्ये कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता ७५०० मे.टन एवढी असताना सरासरी प्रतिदिन ९ हजार मे. टनाने गाळप करत एकूण १० लाख ८४ हजार मे.टन ऊसाचे गाळप केले आहे. जिल्ह्यामध्ये सर्वोच्च सरासरी ११.७४ टक्के साखर उतारा राखत १२ लाख ६७ हजार ६५० क्विटल साखर उत्पादन घेतले आहे. कारखान्याकडे मुबलक ऊस तोडणी वाहतूक यंत्रणा उपलब्ध असून, ऊस तोडणी वाहतूकीचे योग्य व चांगल्या प्रकारचे नियोजन केल्यामुळे संपूर्ण पुणे जिल्ह्यात कारखान्याने क्रमांक एकचा साखर उतारा राखला आहे. कारखान्याने कार्यक्षेत्रातील आडसाली ७ लाख ६ हजार मे.टन, पुर्व हंगामी १ लाख १३ हजार मे.टन, सुरु १३,९९५ मे.टन, खोडवा ६५,४२६ मे.टनाचे गाळप केले असल्याची माहिती सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी दिली.
जगताप यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हंटले आहे की, कारखान्याकडे तोडणी वाहतूक यंत्रणेने शेतकरी सभासदांचा ऊस जळीत करुन आणलेस तोडणी वाहतूक यंत्रणेच्या बीलातून २०० रुपये प्रति टन कपात करण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतला आहे. जर सभासद शेतकऱ्यांच्या सहमतीने ऊस जळीत करुन कारखान्याकडे गाळप करण्याचा निर्णय घेतल्यास शेतकऱ्यांच्या ऊस बीलातून प्रति मे.टन ५० रुपये प्रमाणे कपात करण्यात येणार आहे. त्यामुळे कपातीचे नुकसान टाळणेसाठी सभासद शेतकऱ्यांनी आपला चांगला ऊस जाळण्यास परवानगी देवू नये. कारखान्याकडे नोंद केलेल्या सभासदांच्या व बिगर सभासदांच्या संपुर्ण ऊसाचे गाळप करण्यासाठी कारखाना कटीबद्ध असल्याचे जगताप म्हणाले.
सध्या ऊस तोड कामगारांकडून ऊस तोडणीसाठी पैशाची मागणी केली जात असल्याच्या तक्रारी कारखाना प्रशासनाकडे येत असून पैशाची मागणी झाल्यास त्याची लेखी तक्रार कारखान्याकडे द्यावी. याची चौकशी करुन ऊस तोड यंत्रणेने घेतलेल्या पैशाची कपात त्यांचे ऊस तोडणी वाहतूक बीलातून कपात करुन सभासद शेतकऱ्यांना परत केले जातील.
जगताप पुढे म्हणाले की, कारखान्याने जाहीर केलेल्या धोरणानुसार पुढील हंगामाकरीता सुरु लागणीस १५० रुपये प्रति.टन व खोडव्यासाठी १५० रुपये प्रति टन अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला असून ही रक्कम पुढील हंगामाच्या तुटणाऱ्या ऊसासाठी लागू असेल. कारखान्याची बहुतांश शेती ज्या निरा डावा कालव्यावर अवलंबून आहे. निरा डावा कालव्याचे आवर्तन कारखान्याचे मार्गदर्शक व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या योग्य नियोजनामुळे व सहकार्यामुळे जून अखेरपर्यंत सुरु राहणार असल्याने शेतकऱ्यांनी सुरुच्या लागणी व तुटणाऱ्या ऊसाचे खोडवे राखण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.
...............
चालू हंगामामध्ये १ मार्चपासून ते हंगाम संपेपर्यंत तुटणाऱ्या ऊसास प्रति.मे.टन १५० रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय संचालक मंडळाने घेतलेला आहे. त्यामुळे मार्चपासून तुटणाऱ्या ऊसास प्रति.मे.टन ३,१५० रुपये असे एकरकमी ऊस बील सभासद शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येणार आहे.
पुरुषोत्तम जगताप - अध्यक्ष सोमेश्वर सहकारी साखर कारखाना
COMMENTS