सोमेश्वर रिपोर्टर टीम------
भोर : संतोष म्हस्के
पुणे जिल्हा परिषद पुणे शिक्षण प्राथमिक विभागाच्या माध्यमातून पवित्र पोर्टल भरती २०२२ अंतर्गत शाळा निहाय ४८ प्राथमिक शाळांना अखेर शिक्षक मिळाल्याने तालुक्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे.
भोर तालुक्यात मागील एक वर्षापासून २०० हून अधिक शिक्षकांची कमी असल्याने शैक्षणिक गुणवत्तेत घसरण झाली होती. झिरो शिक्षकी ३८ शाळा होत्या.त्यामुळे या शाळेच्या विद्यार्थ्यांची गुणवत्ता पूर्णता ढासळली होती.मात्र पवित्र पोर्टल भरतीच्या माध्यमातून तालुक्यात ४८ शाळांवर शिक्षकांची नेमणूक झाल्याने पुढील काळात विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता वाढणार आहे. सध्याच्या नवनिर्वाचित शिक्षकांपैकी उपशिक्षक -२९, पदवीधर- १६ तर सेमी इंग्रजी - ३ असे एकूण ४८ शाळांवर शिक्षकांची भरती करण्यात आली आहे. ४८ शाळांवर शिक्षकांची नेमणूक झाली असल्याने पालक वर्गातून समाधान व्यक्त केले जात असले तरी पुढील काळात उर्वरित १८० शाळांवर शिक्षकांची नेमणूक लवकरात लवकर शिक्षण विभागाने करावी अशी मागणी पालक वर्गातून होत आहे.