सोमेश्वर रिपोर्टर टीम------
सासवड : प्रतिनिधी
सासवडमधील पालखीतळावर अजित पवार यांनी केलेला अपमान, केवळ विजय शिवतारेंचा नसून तो संपूर्ण पुरंदरच्या स्वाभिमानी जनतेचा आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सासवडच्या पालखी त्या अपमानासाठी अजित पवार इथे येऊन माफी मागणार का, असा प्रश्न उपस्थित करत बारामती लोकसभा मतदारसंघ हा कोणाचा सातबारा नाही. आता अजित पवारांचा बदला घेण्याची वेळ आली असल्याचे माजी मंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
अजित पवार यांनी पालखी तळावरून भाषणात विजय शिवतारे यांना आव्हान दिले होते. त्यावेळी शिवतारेंना पराभवाला सामोरे जावे लागले होते. आता त्याच पालखी तळावर रविवारी रात्री झालेल्या एका कार्यक्रमात विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबीयांविरोधात दंड थोपटले आहेत.
विजय शिवतारे म्हणाले, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार यांच्या विरोधात मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे. ५ लाख ८० हजार मतदार पवार कुटुंबीयांच्या विरोधात आहेत, त्यांच्यासाठी मी पर्याय आहे. सुप्रिया सुळेंनी पंधरा वर्षे काहीच काम केले नाही, म्हणून मी निवडणुकीच्या रिंगणात असेन, चिन्ह कोणते असेल, हे अद्याप अस्पष्ट असल्याचेही त्यांनी सांगितले.