बारामती l भारतात सात ते आठ मिनिटाला कर्करोगाने एका महिलेचा मृत्यू : डॉ. सुनील जगताप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सोमेश्वरनगर : प्रतिनिधी
भारतात सात ते आठ मिनिटाला कर्करोगाने एका महिलेचा मृत्यू होत आहे.  कर्करोगापैकी गर्भाशय मुखाचा कर्करोग आता लसीकरण करून रोखू शकतो. किशोर वयातच मुलींचे लसीकरण करून घेतले तर ते अधिकाधिक फायदेशीर ठरते. आता लस घेतल्यास वयाच्या तिशी-पस्तिशीनंतर त्याचे महत्त्व समजेल, असे मत महाराष्ट्र राज्य डॉक्टर सेलचे अध्यक्ष डॉ. सुनिल जगताप यांनी व्यक्त केले. 
          माजी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांच्या सूचनेनुसार पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूटकडून महिला दिनानिमित्त आठ मार्चला 'एचपीव्ही' या गर्भाशयमुखाच्या कर्करोगास प्रतिबंध करणाऱ्या भारतीय बनावटीच्या लसीचे काही प्रमाणात मोफत वितरण करण्यात आले होते. यापैकी सहाशे मात्रा सोमेश्वर शिक्षण प्रसारक मंडळास ग्रामीण भागातील सहाशे मुलींसाठी प्राप्त झालेल्या होत्या. आज सोमेश्वर विद्यालय व सोमेश्वर पब्लिक स्कूल येथे नऊ ते चौदा वयोगटातील सहाशे शालेय मुलींचे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांमार्फत लसीकरण करण्यात आले.
तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोज खोमणे यांच्या मार्गदर्शनाखाली होळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचाऱ्यांनी लसीकरण केले.
 यानिमित्ताने कर्करोगासंदर्भात जनजागृती करण्यासाठी व्याख्यानही आयोजित करण्यात आले होते. याप्रसंगी मंडळाचे सचिव भारत खोमणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. मनोहर कदम, मुख्याध्यापक पी. बी. जगताप, मुख्याध्यापिका किशोरी काकडे, डॉ. गिरीश तवटे, डॉ. अमोल जगताप, डॉ. मनिषा कदम उपस्थित होते.
याप्रसंगी डॉ. जगताप म्हणाले, भारतात दररोज दोनशे स्त्रिया कर्करोगाने मृत्यूमुखी पडतात ही गंभीर आकडेवारी आहे. त्यापैकी गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे प्रमाण अधिक असून दरवर्षी १ लाख २४ हजार स्त्रियांचे गर्भाशयमुखाच्या कर्करोगाचे निदान केले जाते. निदान झाल्यावर उपचार करण्यापेक्षा प्रतिबंधात्मक उपाय उपलब्ध झाले आहेत त्याचा अवलंब करावा.
      डॉ. शशिकांत कदम म्हणाले, गर्भाशयमुखाचा कर्करोग टाळण्यासाठी दोन परदेशी तर एक भारतीय बनावटीची लस उपलब्ध झाली आहे. एचपीव्ही लशीच्या नऊ ते चौदा वयोगटातील मुलींसाठी दोन मात्रा आणि पंधरा ते सव्वीस वर्षीय वयोगटातील मुलींसाठी तीन मात्रा द्याव्या लागतात. या लशी सुरक्षित आहेत. याशिवाय जननेंद्रीयांची स्वच्छता राखावी, मासिक पाळीच्या काळात विशेष स्वच्छता राखावी आणि रोगप्रतिकारक शक्ती टिकवावी.
To Top