बारामती : प्रतिनिधी
धनगर, मराठा आरक्षणासह अनेक प्रश्नांवर राज्य शासनाची कृती चालढकल करणारी तर इतर राजकीय पक्षांची भूमिका राजकीय लाभाची राहील्याने यशवंत सेनेने राज्यातील लोकसभेच्या सर्वच मतदार संघात उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान बीड येथून बाळासाहेब दोडतले यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली.
तर बारामती,माढा,परभणी,शिरुर,सातारा,सांगली मतदार संघातील उमेदवारांच्या नावे लवकरच जाहीर करणार असल्याची माहीती यशवंत सेनेचे प्रदेशाध्यक्ष प्रा.माणिकराव दांगडे पाटील यांनी दिली. मागील वर्षावरात सुरु असलेल्या धनगर,मराठा समाजाच्या आरक्षण मागणीकडे राज्य सरकारसह केंद्रसरकारनेही गांभीर्याने पाहीले नाही.किंबहुना मराठा विरुद्ध इतर मागास तर धनगर विरुद्ध आदिवाशी अशी सामाजिक विभागणी करण्याचा गंभीर प्रकार झाला. यामुळे आज सामाजिक सलोखा धोक्यात आल्याचे चित्र आहे. यात राज्य सरकारने वेळकाढूपणा केला. या प्रश्नांकडे राज्यातील सर्वच राजकीय पक्षांनी राजकारण करण्याचा प्रयत्न केला व त्यातून या समाजघटकांचे प्रश्न सुटण्यापेक्षा चिघळवत ठेवण्याकडे कल दिसून आला.या सर्वाचा निषेध म्हणून बी.के.कोकरेप्रणित यशवंत सेना राज्यातील सर्वच लोकसभा मतदार संघात उमेदवार उतरविणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष प्रा.दांगडे पाटील यांनी सांगितले. यशवंत सेनेच्या कोअर कमिटीच्या आजच्या बैठकीत बीड येथून माजी राज्यमंत्री व सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांची उमेदवार जाहीर केली. तर बारामती,माढा,परभणी,सांगली आदी मतदार संघातील आणखी ९ उमेदवारांची नावे निश्चित केल्याची माहीती.राष्ट्रीय उपाध्यक्ष आण्णासाहेब रुपनवर व राज्य महासचिव नितीन धायगुडे यांनी दिली. यावेळी जी.बी.नरोटे,समाधान पाटील, दिलीप गडदे,किरण धालपे, दत्ता काळे, बाळा गायके,स्वप्निल मेमाणे, वसंत शिंपले, परमेश्वर वाघमोडे आदी उपस्थित होते.