महिला दिन विशेष l कल्याण दरवाज्यातुन दुर्ग, त्रिकुट, पळसगड, माहुलीगड, भंडारगड सर करत महिलांच्या कर्तृत्वास सलाम

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : विजय लकडे 
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत राजमाता जिजाऊ, श्री शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श लाभलेल्या पळसगड, माहुलीगड आणि भंडारगड हे दुर्ग त्रिकुट टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी गडावर जाणारा सर्वाधिक कठीण मार्ग म्हणून ओळख असणाऱ्या कल्याण दरवाज्यातुन सर करीत महिलांच्या कर्तृत्वास साहसी सलाम केला.
       या मोहिमेची सुरुवात नंदिकेश्वर मंदिर, वांद्रे गाव, ता.शहापुर, जि.ठाणे येथुन पहाटे ५ वाजता झाली.तब्बल तीन तासांची पायपीट केल्यावर कल्याण दरवाजा कडे जाणारा कठीण टप्पा सुरू होतो. पहिला सोप्पा कातळ टप्पा पार केल्यावर तुटलेल्या कातळ कोरीव पायऱ्यांचे दर्शन होते. पायऱ्यांवरून वर आल्यावर एक छोटा कातळ टप्पा ओलांडुन चिमणी क्लाइंब करून वर जावे लागते.वर आल्यावर उजव्या बाजुला कल्याण दरवाज्याकडे जाणारा मुख्य कातळ टप्पा येतो. ४५ अंशातील हा निसरडा ४० फुटी टप्पा मोठ्या चिकाटीने पार करावा लागतो. पुढे एक धोकादायक १० फुटी टप्पा पार केल्यावर कातळात कोरलेल्या पायरी मार्गाने वर जाता येते. येथे एक शेवटचा अंगावर येणारा ३० फुटी कातळ टप्पा मोठ्या शिताफीने पार करून खुप कमी गिर्यारोहकांनी अनुभवलेल्या कल्याण दरवाजातुन दुर्ग त्रिकुटातील भंडार गडावर पाऊल ठेवता येते.
       दुर्ग त्रिकुटतील एतिहासिक वास्तूंना भेट दिल्यावर माहुली गडावर असणाऱ्या महादरवाजा समोरील शिवपिंडी समोर सर्व गिर्यारोहक नतमस्तक झाले. पुढे पळसगडावर असणाऱ्या गणेश दरवाज्यातुन गड उतार होत खोरं, ता.शहापुर, जि.ठाणे या गावी पोहोचण्यासाठी सुमारे दोन तासांची पायपीट करावी लागली. अश्या प्रकारे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत खडतर अश्या कल्याण दरवाज्याचा अनुभव घेत दुर्ग त्रिकुटाची तेरा किलोमीटरची पदभ्रमंती बारा तासात करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी महिलांच्या कर्तृत्वास अनोखी साहसी सलामी दिली.
To Top