सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात गाव,वाड्या वस्त्यांवर नेते,कार्यकर्ते मतदारांच्या गाठीभेटी घेण्यात मग्न झाले असून आपापल्या उमेदवाराबद्दल माहिती देण्यासाठी होम टू होम फिरत असल्याने प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे.
महाविकास आघाडीच्या उमेदवार सुप्रिया सुळे तर महायुतीच्या सुनेत्रा पवार आहेत.सुनेत्रा पवारांना तरुण युवक-युवती तर सुप्रिया सुळे यांना बुजुर्ग व्यक्ती तसेच मध्यमवयीन मतदारांकडून पसंती दिली जात आहे.प्रचारात महाविकास आघाडी कडून मागील १५ वर्षात केलेल्या विकास कामांची माहिती मतदारांपर्यंत पोहोचवून मते मागितली जात आहेत तर पुढील काळात महायुतीच्या उमेदवार निवडून आल्यास बेरोजगार तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली जाईल या मुद्द्यांवर कार्यकर्ते घरोघर फिरत मत मागत आहेत.प्रचाराची लगबग वाढली असून मोठ्या गावात व जिल्हा परिषदेच्या गटात फक्त सभा, कॉर्नर बैठका होत आहेत. हळूहळू भागात प्रचाराला वेग आला असल्याचे दिसून येत आहे.दोन्ही उमेदवार महिला असल्याने तालुक्यात प्रचारासाठी महिला मेळाव्यांवर भर दिला जात आहे.प्रचारा दरम्यानच्या सभांमध्ये एकमेकांवर चिखलफेक करून निवडणुक प्रचारात नेते,कार्यकर्ते रंग भरत आहेत.
औद्योगिक वसाहतीचा मुद्दा प्रचारात रंगतोय
सध्या लोकसभेचा प्रचार भोर तालुक्यात दोन्ही उमेदवारांकडून जोरदार सुरू असून महायुती व महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून प्रचाराच्या सभांमध्ये औद्योगिक वसाहतिचा मुद्दा रंगवून सोडला जात आहे.दरम्यान कोणत्याही पक्षाकडून रोजगार निर्मितीसाठी ठोस पावले उचलली जात नसल्याने बेरोजगार युवक -युवतींमध्ये खदखद व्यक्त होत आहे.