महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दोन दिवसात सहा किल्ले केले सर : टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांची कामगिरी

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
पुरंदर : विजय लकडे
महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाचे औचित्य साधत पालघर जिल्ह्यातील गंभीरगड, सेगवागड, बारडगड, बल्लाळगड, विवळवेढेगड आणि अशेरीगड हे सहा गिरिदुर्ग दोन दिवसात सर करीत ३५ किलोमीटरची पदभ्रमंती करीत टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या गिर्यारोहकांनी महाराष्ट्र राज्यास प्रणाम केला. महाराष्ट्र राज्य निर्मितीसाठी हौतात्म्य पत्करलेल्या १०६ हुतात्म्यांचे स्मरण करून कामगारांच्या कार्यास यावेळी सलाम करण्यात आला.
      या मोहिमेची सुरुवात सकाळी सहा वाजता करण्यात आली. पहिल्या दिवशी १२ तासात १७ किलोमीटरची पदभ्रमंती करून गंभीरगड, सेगवागड आणि बारडगड हे तीन दुर्ग सर करण्यात आले. रात्रीचा मुक्काम करून दुसऱ्या दिवशी पहाटे ५ वाजता मोहिमेची सुरुवात झाली. दुसऱ्या दिवशी १२ तासात १८ किलोमीटरची पदभ्रमंती करून बल्लाळगड, विवळवेढेगड आणि अशेरीगड सर करण्यात आले.
     उष्णतेच्या लाटेत गिर्यारोहकांची मानसिक आणि शारीरिक कसोटी पाहणारी ३५ किलोमीटरची गिरीदुर्गांवरील भटकंती, दुर्गांवर असणारी पाण्याची कमतरता, काही ठिकाणी असणारी मधमाश्यांची पोळे, दमछाक करणारी निसरडी पाऊलवाट, आडवाटेची भटकंती असल्याने चकवा देणाऱ्या पाऊलवाटा अश्या सर्व आव्हानांना सामोरे जात टीम पॉइंट ब्रेक ॲडवेंचर्सच्या जॅकी साळुंके, लव थोरे, कमलसिंग क्षत्रिय, अमृत भावसार, भारत पिंगळे, धर्मेश उपासे, गणेश भंडारी, राजेंद्र साळुंके, सिमा बुधवंत, सोहम भोसले, विभा येवले, सुमेश क्षत्रिय आणि डॉ.समीर भिसे यांनी मोहीम सुरक्षितपणे यशस्वी केली.
To Top