सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : प्रतिनिधी
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील दुर्गम डोंगरी हिर्डोस मावळ खोऱ्यातील सहा तर पूर्वेकडील पुणे-सातारा महामार्गालगतच्या एका गावाला पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली होती.सात गावांचे टँकर मागणीचे प्रस्ताव पंचायत समिती पाणी विभागाकडे आले होते.त्यातील ६ गावांचे प्रस्ताव मंजूर असून आज मंगळवार दि.९ पाण्याचे टँकर सुरू होणार असल्याने आजपासून सहा गावांची तहान भागणार आहे. परिणामी पाणीटंचाईची तीव्रता शिथील होणार आहे.
भोर तालुक्यात यंदा पावसाचे प्रमाण कमी झाल्याने मागील वर्षीच्या तुलनेत लवकरच पाणीटंचाईला तालुक्यातील अनेक गावांना सामोरे जावे लागत आहे.पहिल्या टप्प्यात पश्चिमेकडील दुर्गम भागातील उंबार्डे ,पऱ्हर ,नानावळे (शिंदेवाडी), शिलिंब,राजीवडी तर महामार्ग लगतच्या करंदी खेबा. गावांना पिण्याची पाण्याची टंचाई असल्याने पाणी मागणी प्रस्ताव दिले गेले होते.शासन स्तरावर तात्काळ या सहा गावांच्या पाण्याची टंचाई दूर होण्यासाठी टँकरची मान्यता मिळाली असल्याने टँकर सुरू होणार आहेत.तर पुणे-सातारा महामार्गावरील शिंदेवाडी ,ससेवाडी ,मोरवाडी येथील गावांचे प्रस्ताव आलेले आहेत. लवकरच या तीन गावांच्या टँकर मागणीचे प्रस्तावांना मान्यता घेऊन पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात येईल असे पाणीपुरवठा विभागाचे कनिष्ठ अभियंता राजेंद्र पिसाळ यांनी सांगितले.
--------------------
पाणीबाणीची वेळ येणार
भोर तालुक्यात गतवर्षी झालेला अल्प पाऊस, उन्हाच्या तीव्र झळामुळे आटलेले पानवठे, ओढे ,नाले तसेच बंधारे यांनी गाठलेला तळ ,कोरड्या पडलेल्या विहिरी यामुळे अनेक गावे आणि वाड्यावर वस्त्यांमध्ये तीव्र पाणीटंचाई जाणवत आहे.दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण होत चालली असून अजूनही पुढील दोन महिने उन्हाळा असल्याने पाणीबाणीची वेळ येणार असल्याचे तालुक्यात चित्र आहे.