लोणावळा l मालाडकरांच्या लेखणीतून उतरला वैज्ञानिक दृष्टीकोन : राजन लाखे

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
लोणावळा : श्रावणी कामत 
समाजात वावरत असताना लेखक वास्तववादी घटना, अनुभव ग्रहण करतो आणि त्याचेच प्रतिबिंब आपल्या लेखणीतून उतरवतो. तसेच दैनंदिन जीवनात शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, नैसर्गिक याबरोबरच वैचारिक प्रगल्भता याचे प्रतिबिंब डॉ. मालाडकर यांच्या लेखणीतून उतरले आहे. ज्याप्रमाणे तुम्ही एखाद्या क्षेत्रात काम करता त्याचा प्रभाव तुमच्या विचारसरणीवर होतो. मालाडकरांच्या लेखणीतून वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला पाहायला मिळतो, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष राजन लाखे यांनी केले.
ज्येष्ठ वैज्ञानिक, साहित्यिक डॉ. निळकंठ मालाडकर यांच्या 'स्वानंदी' कथासंग्रह आणि 'राजस' काव्यसंग्रहाचे प्रकाशन शनिवारी येथे करण्यात आले. यावेळी कर्नल (निवृत्त) सुरेश पाटील, लेखक डॉ. निळकंठ मालाडकर, उज्ज्वला मालाडकर, डॉ. समीर मालाडकर, डॉ. मनिष मालाडकर, दिपाली मालाडकर, एच. ए  स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाचे मोहन बाबर, सुयश कुलकर्णी, विजय भिसे आदी उपस्थित होते.
डॉ. मालाडकर यांच्या वैज्ञानिक कथांमधून वास्तववादी जीवनाची अनुभूती वाचकांना येईल. सध्या सर्जनशीलतेवर कृत्रिम बुद्धिमत्तेचे प्रयोग सुरू आहेत; याचा पुढील पिढीवर काय परिणाम होईल हे लेखकाने सांगण्याचा प्रयत्न केला आहे, असे उज्ज्वला मालाडकर यांनी प्रास्ताविकात सांगितले.
डॉ. मालाडकर यांच्या कथा, कवितांमधून सर्जनशीलता, समाजाप्रती प्रेमळ पण तेवढाच कणखर माणूस वाचकांना पहायला मिळतो. ९१ वर्षांच्या या तरुणाची विज्ञानाबरोबर साहित्यातील मुशाफिरी कौतुकास्पद असून आपल्याला नवी दिशा देणारी आहे, असे कर्नल (नि.) सुरेश पाटील म्हणाले.
  विजय भिसे, सुयश कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. आभार उज्ज्वला मालाडकर यांनी मानले. यावेळी डॉ. मालाडकर यांच्या काही मोजक्या कवितांचे वाचन करण्यात आले. एच. ए. स्कूलच्या माजी विद्यार्थी संघाने कार्यक्रमाचे संयोजन केले.
------------------------
जीवनात अमुलाग्र बदल - डॉ. निळकंठ मालाडकर 
आज विज्ञान - तंत्रज्ञान क्षेत्रात प्रचंड मोठी क्रांती झाली आहे. माहिती तंत्रज्ञानाच्या युगात मनुष्याच्या जीवनात अनेक बदल झाले असून आपल्या भावविश्वावर त्याचा चांगला - वाईट परिणाम होतो आहे. त्यावर कुठेतरी चौकट आखून भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन मात केली पाहिजे, असे डॉ. मालाडकर यांनी सांगितले. यावेळी त्यांनी भारतीय जवानांवर आधारित 'झुंज' कविता सादर केली. याला उपस्थितांनी टाळ्यांच्या गजरात भरभरून दाद दिला...
To Top