सोमेश्वर रिपोर्टर टीम----
सुपे : दीपक जाधव
सद्याचे सरकार शेतकरी विरोधी असुन त्याच सरकारमध्ये काही सहभागी होवुन आम्हालाच मतदान करा असा दम देत आहेत. मात्र जे दम देत आहेत त्यांना त्या जागेवर कोणी बसवलं आहे हे तुम्हाला अधिक सांगायची गरज नाही. असा अप्रत्यक्ष टोला माजी केंद्रिय कृषी मंत्री शदर पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
सुपे येथील पुजा गार्डन येथे जनसंवाद दौऱ्याच्यानिमित्ताने शरद पवार बोलत होते. याप्रसंगी पुरंधरचे आमदार संजय जगताप, विजयराव कोलते, सतिश खोमणे, सदाशिव सातव, युगेंद्र पवार, सुदाम इंगळे, तालुकाध्यक्ष ॲड. एस. एन. जगताप, बापुराव चांदगुडे, संपतराव काटे आदीसह शिवसेनेचे, कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. सद्याचे सरकार हुकुमशाहा सारखे वागत असुन लोकशाहीचे अधिकार उद्धस्थ करण्याचे काम करीत आहे. तसेच सत्तेचा गैरवापर करुन दोन मुख्यमंत्र्यांना जेलमध्ये टाकण्याचे काम त्यांनी केले. या सरकारने शेतकरी विरोधी धोरणे राबवली. त्यामुळे शेतकऱ्याच्या कांद्याचा आणि सोयाबिन पिकाचा उत्पादन खर्चही निघत नाही. या सरकारला निवडणुकित शेतकरी जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही.
तुम्ही ज्यांना आधी निवडून दिले त्यांनी संसदेत तुमचे प्रश्न मांडले. त्यात सुप्रिया सुळेंचे नाव पहिले असल्याचे सांगून पवार पुढे म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कोणी स्थापन केला. जनाई - शिरसाई उपसा जलसिंचन योजना कोणी राबवली हे शेतकऱ्यांना सांगु नये. मी दिल्लीतील काम पहात असताना राज्याची जबाबदारी तालुक्यातील प्रतिनिधीकडे दिली होती. पण त्यांनी काय दिवे लावलेत हे आता पहतोय.
यावेळी सभेत पवार बोलत असताना एक चिठ्ठी व्यासपिठावर आली. त्यात जनाई - शिरसाईचे पाणी हवे असेल तर घड्याळाला मतदान करा म्हणुन दम दिला जातो. अन्यथा तुमची विकास कामे करणार नाही अशी भाषा वापरली जाते. पण एक लक्षात ठेवले पाहिजे की आपणा दम देतो आहोत त्या पदापर्यंत कोणी आणले हे विसरता कामा नये असा खोचक टोला पवार यांनी अजित पवार यांना लगावला.
यावेळी आमदार संजय जगताप म्हणाले की, ज्येष्ठ नेते शरद पवार यांना मानणारी सुपे परगण्यासारखीच पुरंदरची स्थिती आहे. बारामती प्रमाणेच पुरंदर सुद्धा कुठेही कमी पडणार नाही. ५० हजारांचे मताधिक्य देणार असल्याचे बघायला मिळेल. भाजप सरकारला आता जागा दाखवण्याची वेळ आली आहे.
प्रास्तावीक हनुमंत चांदगुडे यांनी केले. सुत्रसंचालन दिपक वाबळे, समाधान देशमुख, हृषीकेश गाडेकर यांनी केले. सचिन लडकत यांनी आभार मानले.