सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मोरगाव : मनोहर तावरे
राज्यात नेहमीच एखादी गंभीर दुर्घटना घडल्यानंतर प्रशासनाला जाग येते असाच काहीसा प्रकार ‘मोरगाव’ येथे समोर आलाय. विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असलेल्या महिला कर्मचाऱ्यावर प्राणघातक क्रूर हल्ला व मृत्यू झाल्यानंतर महावितरण विभागाला जाग आलीय. येथील सब स्टेशन व कार्यालय ठिकाणी तीन सुरक्षारक्षक नेमण्याचा ‘आदेश’ काढण्यात आलाय.
मोरगाव येथे घरगुती वापराचे वाढीव बिल आल्याने एका तरुणाने चिडून जात येथील कार्यरत असलेल्या महिला तंत्रज्ञ कर्मचाऱ्यावर हल्ला झाला. बुधवार दि.२४ एप्रिल रोजी ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेत रिंकू बनसोडे यांचा नाहक बळी गेला आहे. संपूर्ण राज्यात या घटनेचे तीव्र पडसाद उमटले असून सर्व कर्मचारी संघटना न्याय मिळण्यासाठी एकत्र आल्या आहेत. प्रकरणाचे गांभीर्य पाहून उशिरा का होईना वितरण कंपनीला जागा आली.
पुणे जिल्हा सुरक्षा मंडळाच्या मार्फत मोरगाव विद्युत वितरण कंपनीच्या सबस्टेशन ठिकाणी तीन शिफ्ट मध्ये तीन सुरक्षारक्षक नेमणूक करण्याबाबत अधीक्षक अभियंता यांचेमार्फत कळविण्यात आले आहे. महावितरण विभागात दैनंदिन कामकाज या संदर्भात अनेक तक्रारी प्रलंबित असून, अधिकाऱ्यांच्या मनमानी व हलगर्जीपणा याचा सर्वसामान्य कर्मचाऱ्यांना फटका बसत असल्याचे समोर आले आहे.