सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
भोर : संतोष म्हस्के
भोर तालुक्याच्या पश्चिमेकडील हिर्डोस मावळ खोऱ्यातील नीरा-देवघर धरण क्षेत्रात अत्यल्प पाणीसाठा असतानाही धरण प्रशासनाने पूर्वेकडील भागात मागील १० ते १५ दिवसांपासून मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.हिर्डोस मावळ खोऱ्यात पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या असतानाही धरण क्षेत्रातील पाण्याचा विसर्ग सुरू केल्याने संतप्त धरणग्रस्त नागरिकांनी धारेवर धरून आंदोलन छेडल्याने प्रशासनाने तात्काळ पाण्याचा विसर्ग बंद केला.
हिरडोस मावळातील ता.भोर अनेक गावे निरा-देवघर धरणाच्या पाणीटंचाई पाण्यावर अवलंबून आहेत. सध्या कडक उन्हाळा पडल्याने धरण परिसरातील गावांची पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या निर्माण झालेली असतानाही प्रशासनाने धरणातून २ हजार क्यूसेक्सने पाण्याचा विसर्ग सुरू केला होता.यामुळे धरणात २६ टक्के पाणीसाठा उरला होता.पुढील काळात पाणी पाणी करण्याची वेळ हिर्डोस मावळ धरणग्रस्तांना येणार असल्याने धरणग्रस्तांनी तात्काळ जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करून तात्काळ धरणातून सुरू असलेला विसर्ग रोखला आहे.यावेळी ३० ते ३५ धरणग्रस्तांनी धरणाच्या गेटवर बसून काळ्याफिती लावून घोषणाबाजी केली.अखेर धरण प्रशासनास पाणी बंद करण्यास भाग पाडले.कालवा सल्लागार समितीच्या नियोजन बैठकीमध्ये निरा -देवघर धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन केले गेले होते.यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू होता असे निरा पाटबंधारे विभाग सहाय्यक अभियंता योगेश भंडलकर यांनी सांगितले.