जावली l सातारा मतदार संघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेतले जात नाही : जावळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांचा आरोप

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम-----
मेढा : ओंकार साखरे
सातारा लोकसभा मतदारसंघाची महायुतीची उमेदवारी छत्रपती उदयनराजे भोसले यांना जाहीर होऊन त्यांनी शक्ती प्रदर्शनाने अर्ज दाखल केला. मात्र याच महायुतीत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी (अजित पवार गटास ) सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्वाकडून विश्वासात घेत नसल्याचा आरोप जावळी राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष साधू चिकणे यांनी केला असून यामुळे महायुतीच्या उमेदवारास  याचा फटका बसण्याचे संकेत देखील त्यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिले आहेत.
            राज्यात महायुती एकत्रितपणे लोकसभा निवडणूक लढवीत आहे. मात्र सातारा लोकसभा मतदारसंघात मोडणाऱ्या सातारा विधानसभा मतदारसंघातील सातारा व जावळी तालुका राष्ट्रवादी संघटनेस सातारा विधानसभा मतदारसंघातील भाजप नेतृत्व कोणत्याही गोष्टीत विश्वासात घेत नाही .याबाबत पक्षश्रेष्ठींकडे नाराजी व्यक्त करून देखील अद्याप दोन्ही तालुक्यातील राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेत नसल्याचा आरोप प्रसिद्धी पत्रकाद्वारे साधू चिकणे यांनी केला आहे.
           एकीकडे महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे हे जावळी तालुक्यातील भूमिपुत्र आहेत.त्यांच्याबाबत स्थानिक मतदारांमध्ये सहानुभूतीचे वातावरण असताना भाजप नेतृत्वास जावळी तालुक्यात अधिकचे लक्ष केंद्रित करावे लागणार आहे. मात्र भाजप नेतृत्वाकडून हे होताना दिसून येत नाही. याचा प्रत्यय शेंद्रे येथील महायुतीच्या मेळाव्यात देखील पाहायला मिळाला.
            तरी देखील भाजप नेतृत्वाकडून राष्ट्रवादी सातारा तालुका अध्यक्ष व जावळी तालुकाध्यक्ष तसेच दोन्ही तालुक्यातील पदाधिकाऱ्यांशी कोणताही सुसंवाद केला जात नाही. त्यामुळे पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांमधून नाराजीचा सूर उमटत आहे . राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासत घेतले गेले नाही . तर आमच्या कार्यकत्याशी व पदाधिकाऱ्याशी विचार विनिमय करून पुढील निर्णय घेतला जाईल याचा गांभिर्याने विचार केला गेला नाही . तर स्थानिक पातळीवर निर्णययाचा फटका महायुतीचे उमेदवार उदयनराजे भोसले यांना बसू शकतो, त्यामुळे भाजप नेतृत्वाने राष्ट्रवादीस यापुढे विश्वासात न घेतल्यास यापुढील कोणत्याही निवडणूक प्रक्रियेत राष्ट्रवादी (अजित पवार गट) सहभागी होणार नाही. असा इशारा देखील साधू चिकणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.
To Top