Rajgad News l मिनल कंबळे l वेल्हे बुद्रुक येथील विवाहितेची आत्महत्या : संतप्त नातेवाईकांनी पार्थिव पोलीस स्टेशन आवारात नेऊन केला संताप व्यक्त

Admin
सोमेश्वर रिपोर्टर टीम------
राजगड : मिनल कांबळे
वेल्हे बुद्रुक(ता. राजगड) येथे एका विवाहितेने सासरच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिष्मा आकाश राऊत(वय २४ वर्ष) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी मयत करिष्मा हीचे पार्थिव ॲम्बुलन्स सहीत वेल्हे पोलीस स्टेशन आवारात नेऊन संबंधित दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. यामुळे वेल्हे पोलीस स्टेशन परिसरात एकच खळबळ उडाली. याबाबत मयत करिष्मा हीचे वडील शंकर नारायण शेडगे(वय ५४ वर्ष, रा. धामनओहळ, ता. मुळशी. सध्या रा. धायरी गाव, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, फिर्यादी शंकर शेडगे यांची लहान मुलगी मयत करिष्मा आणि आकाश जयराम राऊत(रा. वेल्हे बुद्रुक, ता.राजगड) यांचा २२ फेब्रुवारी २०२२ रोजी विवाह झाला. विवाह झाल्यानंतर पाहिले ५ महिने सगळे सुरळीत चालले होते. त्यानंतर पती आकाशने तसेच सासरे जयराम रघुनाथ राऊत आणि सासू आशा जयराम राऊत यांनी मयत करिष्मास मानसिक व शारीरिक त्रास देण्यास सुरुवात केली. तसेच माहेरच्यांशीही फोनवर बोलण्यास बंदी घातली. फोनवर बोलणे न होत असल्यामुळे वडील शंकर शेडगे हे वेल्हे बुद्रुक येथील घरी करिष्मास भेटायला गेले असता, तुम्ही तिला भेटायला यायचे नाही. असे आकाशने फिर्यादी शेडगे यांस सुनावले.
यानंतर करिष्माने पुढील काही महिने असेच दबावाखाली काढले. त्यानंतर काही महिन्यांनी करिष्मा या गरोदर राहिल्या. शेडगे यांनी खूप वेळा राऊत कुटुंबीयांना करिष्मा हीचे डोहाळे जेवण घालण्यासाठी तिला घरी पाठवण्याची विनवणी केली. परंतु राऊत कुटुंबीयांनी त्यास नकार दिला. आणि प्रसुती होण्याच्या ३ ते ४ दिवस अगोदर करिष्मास घरी पाठवले. २६ जून २०२३ रोजी करिष्मास मुलगी झाली. बाळंत झाल्याच्या पाचव्या दिवशी आकाशने शेडगे यांना फोन करून करिश्मास आहे त्या अवस्थेत सासरी पाठवून देण्यास सांगितले. तीची सध्या उठ-बस करण्याची परिस्थीती नसल्याने तीला महिना- पंधरा दिवस माहेरी राहु द्या. असे शेडगे यांनी म्हणल्यावर आकाशने त्यांच्याशी फोनवर शाब्दीक वाद घातला. त्यानंतर नाईलाजास्तव शेडगे यांनी करिष्मास माहेरी सोडले.
त्यांनंतरही राऊत कुटुंबीयांनी करिष्मावरचे अत्याचार थांबवले नाहीत. अखेर रविवारी(दि. ३१ मार्च २०२४) रोजी करिष्मा हिने सासरच्या जाचाला कंटाळून सासरच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर तिला भारती हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले. त्यानंतर मंगळवारी(दि. २ एप्रिल) उपचारादरम्यान रात्री ८ वाजता डॉक्टरांनी तिला मयत घोषित केले. संतप्त नातेवाईकांनी आज बुधवारी(दि. ३ एप्रिल) दुपारी भारती हॉस्पिटल येथून ॲम्बुलन्सद्वारे पार्थिव थेट वेल्हे पोलीस स्टेशन आवारात आणून करिष्मास न्याय मिळावा यासाठी दोषींवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली. वेल्हे पोलिसांनी त्वरित या घटनेची दखल घेत पती आकाश राऊत, सासरे जयराम राऊत आणि सासू आशा राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. सदर घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन खामगळ यांच्या मार्गदर्शनाखाली वेल्हे पोलीस करीत आहेत.
To Top